मतमोजणी केंद्रातून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जींना माध्यमवाल्यांनी घेरले आणि आधीच पक्षाच्या आणि मग स्वत:च्या पराभवामुळे त्रस्त झालेल्या या एकेकाळी झुंजार नेत्यासमवेत दोन-चार कार्यकर्तेच काय ते सोबत राहिले होते. हा वृत्तांत वाचनात आला आणि राजकारण, सत्ता वगैरे किती क्षणभंगूर असते याचा पुन:प्रत्यय येईल. 'दीदी' या शब्दाभोवतीचे वलय आणि वजन निवडणुकीतील अनपेक्षित पराभवामुळे एका दिवसात लयास गेले. ममता बॅनर्जी किती वाईट होत्या किंवा देशविघातक विचारांच्या होत्या, असे आरोप झाले असले तरी मतदान यंत्रातून त्यावर शिक्कामोर्तब झाले हे सत्य नाकारता येणार नाही. दीदी शब्दाचा दबदबा संपुष्टात आला आणि राजीनामा न देण्याबाबतचा हट्टीपणा कायद्यासमोर टिकून राहणार नाही हे माहीत असूनही सत्तेला चिकटून रहाण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्रातील तमाम 'ममता' आणि 'स्टॅलिन' यांचे डोळे उघडून जाईल अशी अपेक्षा आहे.
चुकीची धोरणे, टोकाची भूमिका घेण्याचा फाजिलपणा, आक्रमकपणाला दहशतीची साथ, निधर्मवादाच्या नावाखाली धार्मिक-द्वेषाचे राजकारण हे ममता यांच्या अंगाशी आले तसेच पक्षांतर्गत दुफळी आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळेही मतदारांच्या नजरेतून त्या उतरल्या. मतमोजणी केंद्राबाहेरचे वृत्तपत्रांत आलेले वर्णन वाचताना ममता यांचा उतरलेला चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यांनीच बनवलेली त्यांची लढवय्या नेतृत्वाची प्रतिमा भंग झाली होती. असे भंग होणे त्या नेत्याला जितके क्लेशदायक असते, तितकेच पक्षातील लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना, अशा खच्चीकरणातून पुन्हा उसळी घेणे सोपे नसते आणि त्यासाठी पक्षसंघटनेचे बळ लागते. ममता यांच्या चांगल्या दिवसांत त्यांच्या पुढे-मागे करणारे कार्यकर्ते हळूहळू गायब होतील आणि तृणमुलला पुन्हा उभे रहाणे आव्हानात्मक होणार आहे.
पश्चिम बंगालच्या निकालानंतर प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाबाबत चर्चा सुरु झाली आहे. या सर्व नेत्यांनी ममता आणि स्टॅलिन यांच्या चुकांचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. या प्रादेशिक नेत्यांमध्ये जे सध्या भाजपाबरोबर आहेत, अशा पक्षांनाही तितकाच धोका आहे, हे नाकारुन चालणार नाही. त्यामुळे भाजपाचा विजय झाला म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली नव्याने बांधणी करु पहाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही आनंद व्यक्त करताना त्यांच्या अस्तित्वाची खबरदारी घ्यावी लागणार आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष एकखांबी तंबू बनला होता. ममतांनी भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे धुरा सोपवून घराणेशाही सुरु केली. तीही त्यांच्या अंगलट आली. त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त प्रादेशिक नेत्यांनी घराणेशाहीचा नाद करता कामा नये.
तृणमुलमध्ये आर्थिक घोटाळे फार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याची चर्चा होती. महाराष्ट्रात अशी ओरड आहे. प्रादेशिक नेत्यांची आर्थिक स्थिती डोळ्यात खुपेल इतकी सुधारत आहे. जनतेला या नेत्यांचे राहणीमान, त्यांचे जमीन-जुमले, आलिशान बंगले, ठेकेदारांशी व्यवहार आणि बांधकाम व्यवसायातील गुंतवणूक माहीत नाही असे नाही. या सर्व व्यवहारांचा फटका तृणमुलला बसला. ममतादीदी आजही खादीची साडी आणि स्लिपर घालतात, पण त्यांचे निकटवर्ती लेक्सस, रेंज रोव्हर आणि खाजगी विमानातून फिरत असतात. लोक डोळ्याला पट्टी आणि कानात बोळे घालून बसलेले नाहीत. महाराष्ट्रातील नेत्यांनी आपली ममता वा स्टॅलिन होऊ नये यासाठी तातडीने पथ्ये पाळायला हवीत. भाजपा अशी आगळीक फार सहन करीत नसते. ती न बोलता राजकीय महत्वाकांक्षांवर बुलडोझर फिरवू शकते. महाराष्ट्रातील सुज्ञ प्रादेशिक नेते योग्य बोध घेतील, असे वाटते.