क्रीडा
मैत्रीपासून मैदानापर्यंत: WPL मध्ये जेमिमा-मानधना आमनेसामने
मैत्रीपासून मैदानापर्यंत: WPL मध्ये जेमिमा-मानधना आमनेसामने
फोटो: ठाणे वैभव
वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, शनिवारी वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर दोन जिवलग मैत्रिणी पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी म्हणून आमने-सामने येणार आहेत. जेमिमा रोड्रिग्सच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि स्मृती मानधनाची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात ही रंगतदार लढत रंगणार आहे. RCB ने पाच पैकी पाच सामने जिंकत आधीच प्लेऑफचे तिकीट पक्के केले आहे, तर DC ला यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ दोन विजयांवर समाधान मानावे लागले आहे.
या दोन संघांमधील मागील सामना पूर्णपणे RCB च्या बाजूने गेला होता. 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB ने आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. त्या सामन्यात इतिहास घडण्याची चिन्हे होती. मानधना WPL मधील पहिले शतक झळकावणारी खेळाडू ठरणार, असे वाटत असतानाच ती 96 धावांवर बाद झाली. याआधी, दिल्लीसाठी, भारताची सलामीवीर आणि मानधनाची भारतासाठी खेळतानाची सलामी साथीदार, शफाली वर्माने 62 धावांची खेळी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली होती. मात्र, लॉरेन बेलच्या अचूक माऱ्याने आणि तिच्या साथीला मुंबईच्या सायली सातघरेने दिलेल्या पाठबळामुळे DC ची गाडी रुळावरून घसरली. दुसऱ्या डावात धावांच्या पाठलागात मानधनाला ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वॉलची उत्तम साथ लाभली आणि तिच्या नाबाद अर्धशतकामुळे RCB चा विजय सोपा झाला.
हा सामना नवी मुंबई टप्प्यातील अखेरचा सामना होता. त्यानंतर वडोदऱ्यात खेळलेल्या आपल्या एक-एक सामन्यांत दोन्ही संघांनी विजय मिळवत आत्मविश्वास उंचावला आहे. RCB ने 178 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे राखत गुजरात जायंट्सवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला, तर तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 155 धावांचा पाठलाग करताना, गतविजेत्या आणि दोन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर सात विकेट्स राखून मात करत दमदार पुनरागमन केले.
दोन्ही संघांचे आता फक्त तीन साखळी सामने उरले असून, विशेषतः दिल्लीसाठी प्रत्येक सामना जवळपास ‘करो या मरो’ असा आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा अलीकडचा विजय त्यांच्यासाठी मोठा आत्मविश्वास देणारा ठरला, कारण संघाच्या कर्णधार जेमिमा रोड्रिग्सने अखेर आपला फॉर्म गवसला. नाबाद अर्धशतक झळकावत तिने संघाला विजयापर्यंत नेले आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
तरीही गुणतालिकेतील DC चे स्थान चिंतेचा विषय ठरत आहे. मागील हंगामांमध्ये, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सातत्याने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र यंदा नव्या कर्णधारपदाखाली खेळताना अपेक्षित निकाल सातत्याने मिळालेले नाहीत आणि त्यामुळे संघ अडचणीत सापडलेला दिसतो.
प्लेऑफसाठी अजूनही दोन जागा रिकाम्या असल्याने, दिल्ली कॅपिटल्स, RCB चा विजयी रथ रोखण्याचा आणि त्यांची पाच सामन्यांची विजयी मालिका खंडित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. यासाठी लिझेल ली, लॉरा वोल्वार्ड्ट आणि मारिझान काप या अनुभवी दक्षिण आफ्रिकन त्रिकुटाकडून मोठ्या योगदानाची अपेक्षा असेल. गोलंदाजीची धुरा नंदिनी शर्मावरही असेल, जिने याच हंगामात हॅट्ट्रिक घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत आपले नाव कोरले आहे.
मात्र आत्मविश्वासाने ओसंडून वाहणाऱ्या RCB ला पराभूत करणे सोपे नसेल. मानधनाच्या कुशल नेतृत्वाखाली, WPL 2024 च्या विजेत्या RCB ने यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. कर्णधाराच्या शानदार फॉर्मसोबतच परदेशी खेळाडूंनीही मोलाची साथ दिली आहे - ग्रेस हॅरिसचा स्पर्धेतील सर्वोत्तम स्ट्राइक रेट, नदिन डी क्लर्कचे अव्वल दर्जेचे अष्टपैलू योगदान आणि लॉरेन बेलची सातत्याने निर्धाव चेंडू फेकण्याची क्षमता.
रिचा घोष, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांसारख्या भारतीय खेळाडूंनीही सातत्याने निर्णायक क्षणी कामगिरी करत RCB ला आणखी भक्कम बनवले आहे. त्यामुळे सध्या RCB हा पराभूत करायला सर्वांत कठीण संघ वाटतो.
आज वडोदरा एका थरारक सामन्यासाठी सज्ज आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील दोन मोठी नावे—स्मृती मानधना आणि जेमिमा रोड्रिग्स—समोरासमोर असताना, नशीब कुणाच्या बाजूने झुकेल? RCB च्या विजयी घोडदौडीला DC लगाम घालणार की WPL मध्ये सलग सातवा विजय नोंदवत RCB आणखी एक इतिहास रचणार?
आमने-सामने (मागील 5 सामने)
दिल्ली कॅपिटल्स – 2 | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - 3
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 24 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: कोटांबी स्टेडियम, वडोदरा
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.