संपादकीय
‘महाराष्ट्र नेक्स्ट‘ : पुढे काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीत मिळणारी मतदारांची हुलकावणी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वलय यामध्ये प्रचंड तफावत पुन्हा एकदा गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात दिसली. श्री. ठाकरे यांचे सडेतोड विचार जनतेला प्रभावित करीत राहतात आणि त्याची प्रचिती मेळाव्यास जमलेल्या गर्दीने पुन्हा दिली. तरी तफावत का राहते हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तर नक्कीच सापडू शकेल.
महाराष्ट्रातील जनतेकडे प्रतिभा आणि प्रतिमा मुबलक प्रमाणात आहे, परंतु त्याचा वापर राज्याच्या विकासाकरिता होत नाही याची खंत श्री. ठाकरे यांनी मांडली. 'महाराष्ट्र नेक्स्ट' हे संकेतस्थळ मनसेने सुरू केले असून या व्यासपीठावरून महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा होईल ही अपेक्षा आहे. या चर्चेचे स्वरूप वृत्तवाहिन्यांवरील चर्चा अथवा समाज माध्यमांवरील सवंग प्रतिक्रियांपलिकडे असेल ही अपेक्षा आहे. श्री. ठाकरे म्हणाले ते योग्यच आहे की दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांचा जाब विचारण्याची सवय जनतेला लागू नये याकरिता त्यांना करमणुकीत गुरफटून ठेवले जात आहे. जनतेला संशयाचा फायदा देणे किंवा सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवणे योग्य नाही. चूक उभयपक्षी होत आहे आणि ती गेली अनेक वर्षे बेमालूमपणे सुरू झाली आणि आता तर अंगी भिनली. मनसेने त्याकरिता त्यांच्या सैनिकांना काही ठोस कार्यक्रम द्यायला पाहिजे होते, तसे झाले नाही. मनसेच्या संघटनात्मक संरचनेतला तो दोष असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत होते. त्याची दखल घेतली गेली नाही आणि राज ठाकरे यांच्या वलयाचा लाभ उठवला गेला नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला आपल्या शक्तिस्थळापेक्षा मर्यादांची जाणीव झाली असावी. कारण शिवसेना (उबाठा) यांच्याशी हातमिळवणी करूनही सत्ता राखण्यात त्यांना अपयशच आले.
श्री. राज ठाकरे यांच्यावर त्यांच्या सैनिकांचा विश्वास जरूर आहे, परंतु त्यांची भाषणे ऐकून प्रभावित होणारा एक मोठा वर्गही राज्यात आहे. त्यांच्या भाषणातून समाजाने बोध घ्यावा, असे पक्षाला वाटत असेल तर त्याची सुरुवात पक्षपातळीवर करावी लागेल.
मनसे नेतृत्वाकडे कल्पनांची कमी नाही. काही वर्षांपूर्वी निवडणुकीसाठी उमेदवार ठरवताना त्यांना परीक्षेला बसवण्याची कल्पना मांडली गेली होती. तिचे पुढे काय झाले हे त्यांनीच सांगावे. तद्वत 'महाराष्ट्र नेक्स्ट' या संकेतस्थळाचे होता कामा नये. आजच्या तरुणाईशी 'कनेक्ट' व्हायचे असेल तर तंत्रज्ञानाबरोबर उत्तरदायित्वाला महत्त्व द्यावे लागेल. राजकारणाबद्दल तरुणाईस आक्षेप असण्याचे प्रमुख कारण त्यांची ढासळती विश्वासार्हता आहे. मनसेला या आघाडीवर विशेष परिश्रम घ्यावे लागतील. कल्पकतेला कृतीची जोड ही मनसेच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. पुढे (नेक्स्ट) काय होते ते बघू या!
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.