न्यूजलेटर्स

सक्षम विद्यार्थी, सक्षम राष्ट्र: विद्यादान सहाय्यक मंडळाचा प्रेरणादायी प्रवास

सक्षम विद्यार्थी, सक्षम राष्ट्र: विद्यादान सहाय्यक मंडळाचा प्रेरणादायी प्रवास
"देहाकडून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि आपण सगळे त्याचे देणे लागतो," असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून, 'सक्षम विद्यार्थी, सक्षम राष्ट्र' घडवण्याचा ध्यास घेत २००८ साली संस्थापक श्रीकृष्ण (भाऊ) नानिवडेकर यांनी सह-संस्थापक गीता शाह यांच्या समवेत 'विद्यादान सहाय्यक मंडळ' या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. ही संस्था समाजातील गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी अर्थसहाय्य करते. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही केवळ आर्थिक विवंचनेमुळे वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता व कल ओळखून, त्यांना आर्थिक पाठबळासोबतच मानसिक आधार आणि करिअर मार्गदर्शन देण्याचे काम ही संस्था करते. महाराष्ट्रातील ठाणे या मुख्य केंद्रासह संस्थेच्या एकूण ६ शाखा (शहापूर, बोरीवली, पुणे, नागपूर, संभाजीनगर) कार्यरत आहेत. १००० हून अधिक सक्रिय विद्यार्थी, १२५० हून अधिक माजी विद्यार्थी, ६५० हून अधिक 'सेवाभावी कार्यकर्ता पालक' आणि व्यावसायिक तज्ञांच्या नेतृत्वाखाली १७ करिअर मार्गदर्शन टीम असा हा मोठा डोलारा सद्य संस्थापक गीता शाह व्रतस्थपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत. या कार्याची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली, याबद्दल गीता शाह सांगतात, २१ वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये हेमलकसा येथील संस्थेचे प्रदर्शन पाहायला गेल्या असता, आमटे परिवाराच्या समर्पण वृत्तीने त्या प्रभावित झाल्या. त्यांनी तिथल्या नोंदवहीत "जमेल तसे सहकार्य करण्याची इच्छा आहे," असे नमूद केले. त्यानंतर 'आनंदवन स्नेही', ठाण्याचे सर्वेसर्वा भाऊ नानिवडेकर यांचा गीता यांना फोन आला आणि हीच भविष्यातील मोठ्या राष्ट्रसेवेची नांदी ठरली. बाबा आमटे यांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांची भेट घेणे गरजेचे होते. तेव्हा गीता पहाटे ३ वाजता सुमारे २५ जणांचा नाश्ता आणि चहा-कॉफी घेऊन आमटे परिवाराला भेटायला गेल्या. फायझर (Pfizer) मधील नोकरी आणि संसार सांभाळून गीता यांनी तेव्हापासून स्वतःला समाजकार्याला वाहून घेतले. "भाऊंनी त्याच वेळी माझ्यातील कार्यकर्ता ओळखला आणि मला तसे घडविले," असे त्या आवर्जून सांगतात. पुढे हेमलकसासाठी प्रचार, प्रसार आणि निधी संकलन करताना, "आपल्या ठाण्यातही अशी एखादी सामाजिक संस्था असावी," असा विचार भाऊ नानिवडेकर आणि गीता शाह यांच्या मनात आला आणि २००८ मध्ये 'विद्यादान सहाय्यक मंडळा'ची स्थापना झाली. याआधी, २००५ ते २००८ दरम्यान शहापूरमधील १५ ते २० गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. संस्थेत विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक 'कार्यकर्ता पालक' मार्गदर्शक म्हणून नेमला जातो, जो संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यशाळा, तज्ञांची व्याख्याने आणि मुलाखत-पूर्वतयारी असा सर्वंकष पाठिंबा संस्थेकडून दिला जातो. विशेष म्हणजे, आत्मनिर्भर झाल्यावर हेच विद्यार्थी स्वयंप्रेरणेने संस्थेच्या कार्यात पुढाकार घेतात. आज संस्थेत शिकलेली ९५% मुले स्वतःच्या पायावर उभी आहेत. विद्यादानचे हे कार्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू असून, गोवा आणि मध्य प्रदेशातही सुरू करण्याच्या दृष्टीने काम चालू आहे. हे कार्य संपूर्ण भारतभर नेण्याचा संस्थेचा मानस आहे. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील नागरिक घडवण्यासाठी संस्था वैद्यकीय शिबिरे, करिअर मार्गदर्शन, स्पोकन इंग्लिश कार्यशाळा, 'बी फ्रँक' (आत्मविश्वास विकास) आणि डिजिटल सक्षमीकरण यांसारखे उपक्रम राबवते. तसेच, ठाणे आणि कळवा येथे ७ वसतिगृहांच्या माध्यमातून ७० मुला-मुलींच्या निवासाची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात आर्थिक पाठबळ नसताना, संस्थेचा पहिला विद्यार्थी जवळपास दीड वर्ष गीता शाह यांच्या घरी राहूनच शिकला. त्यांच्या समर्पित कार्यासाठी त्यांना 'केशव सृष्टी'सह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. गीता म्हणतात, "समाज हा 'सोशल ऑडिटर' असतो. त्यांच्या कौतुकामुळे आपले कार्य योग्य दिशेने सुरू असल्याची खात्री पटते, तर समीक्षात्मक टीकेमुळे काळानुरूप बदल करण्यास मदत होते." या प्रवासात 'टीजेएस्‌बी बँक' २००८ पासून संस्थेची खंबीर भागीदार राहिली आहे. ज्याप्रमाणे आपल्याला पहिल्या शाळेचे किंवा खेळाचे अप्रूप वाटते, तसेच या बँकेसोबतचे नाते विशेष आणि भावनिक असल्याचे गीता सांगतात. सुरुवातीला जेव्हा संस्थेची पावले स्थिर नव्हती, तेव्हा बँकेने एखाद्या कुटुंबाप्रमाणे साथ दिली, त्यामुळेच हे काम विस्तारता आले.   प्रत्येक विद्यार्थी एक स्वतंत्र, स्वावलंबी आणि प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेला जबाबदार नागरिक बनावा, हाच संस्थेचा हेतू आहे. "व्रतस्थपणे आपल्या ध्येयाचा प्रवास करणे आणि 'विकसित भारत २०४७' च्या स्वप्नात विद्यादान सहाय्यक मंडळच्या माध्यमातून योगदान देणे, हे एक संस्थापक म्हणून मला अत्यंत महत्त्वाचे वाटते," असे गीता शाह नमूद करतात.

संबंधित बातम्या