जिल्हा
मिरा-भाईंदरमध्ये भाजपपेक्षा अन्य पक्षांना अधिक मते; तरीही कौल मान्य – सरनाईक
मिरा-भाईंदरमध्ये भाजपपेक्षा अन्य पक्षांना अधिक मते; तरीही कौल मान्य – सरनाईक
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला असता भाजपला मिळालेल्या मतांच्या तुलनेत अन्य पक्षांना मिळालेली मते एक लाखांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही जनतेने दिलेला कौल मान्य करून पूर्ण निष्ठेने कामास लागणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. या निवडणुकीत पक्षाला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला, तर पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्येही भाजपचे उमेदवार विजयी झाले. एकूण ९५ जागांपैकी भाजपने ७८ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला १३, शिवसेनेला ३ आणि अपक्षाला १ जागा मिळाली आहे.
दरम्यान, हा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात असून निवडणुकीनंतर पंधरा दिवस उलटूनही पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाकडून अंतर्गत समीक्षा सुरू आहे. विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या मतांमुळे मराठी मतांचे विभाजन झाले आणि त्यामुळे शिवसेनेचे जवळपास ३० अधिकृत उमेदवार पराभूत झाल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी शहरातील पराभवावर आपली भूमिका मांडली आहे. मराठी मतांचे विभाजन हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी मान्य केले. मिरा-भाईंदर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असला तरी यावेळी शहरात एकूण १४ लाख ८५ हजार ३३० मते पडली. यापैकी भाजपला ६ लाख ८१ हजार २३६ मते मिळाली, तर उर्वरित पक्षांना मिळून ८ लाख ४ हजार ९४ मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपविरोधात जवळपास १ लाख २२ हजार ८५८ मतांचा कौल गेल्याचे स्पष्ट होते.
हा कौल भाजपविरोधात नसून आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरून शिवसेना आगामी काळात अधिक प्रभावीपणे काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जनतेने दिलेला कौल मान्य करून हा पराभव स्वीकारत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६ एकूण मते
प्रभाग १ ते २४
भाजप – ६,८१,२३६
शिवसेना – ३,५८,२२४
उ.बा.ठा. – १,५४,८३९
काँग्रेस – १,८४,५२२
मनसे – १९,०८९
अपक्ष – ४३,४९३
नोटा – ४३,९२७
एकूण मते – १४,८५,३३०
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.