जिल्हा
ठाण्यात १२ तासांत १११ मि.मी. पाऊस
ठाण्यात १२ तासांत १११ मि.मी. पाऊस
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मागील दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने ठाण्याला झोडून काढले असून अवघ्या १२ तासांत १११ मि.मी. पाऊस झाला. ठाण्यातील अनेक भागात पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे वाहतूक मंदावली होती तसेच लोकलवर देखिल परिणाम झाला होता.
हवामान विभागाने ठाण्याला रेड अलर्ट दिला होता. मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत होता. बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढला होता. संध्याकाळी ६.३० वाजता शहरात ९९.७० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. ठाणे शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. सखल भागात पाणी साचल्यामुळे ठाणेकरांना त्रास सहन करावा लागला होता. अनेक झाडे उन्मळून पडल्याने दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कळवा पूर्व घोलाई नगर, पौंडपाडा, भास्करनगर येथे पारसिक डोंगर पट्ट्यातील वाहत येणारे पावसाचे पाणी वाहणाऱ्या गटारात घुसल्याने गटारे भरून वाहू लागली. परिणामी त्याचा फटका परिसरातील अनेक चाळींना बसला.
बुधवारी सकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याने कळवा पूर्वेतील नाले पुरेसे साफ न झाल्याने नाले तुडुंब भरून वाहू लागले. दुपारी घोलाई नगरमधील शिवगर्जना चाळीत डोंगराचे पाणी आणि नाल्याचे पाणी वाहून आल्याने चाळ परिसरात नदीचे स्वरूप निर्माण झाले होते. या पाण्यातून घराबाहेर दरवाज्यात ठेवलेल्या वस्तू वाहून गेल्या तर काही घरात पाणी शिरल्याने घरातील दैनंदिन वापराच्या वस्तू खराब झाल्या. मुंब्र्यात नाले व गटार ठेकेदारांनी वेळेत साफ न केल्याने मुंब्र्यातील अनेक सखल भागात पाणी शिरल्याने अनेक रस्ते जलमय झाले त्यामुळे शाळेत जाणाऱ्या व शाळेतून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. त्यांना रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून रस्ता शोधून घर गाठावे लागले तर तर शहीद कंपाऊंड, अमृत नगर येथील बाजार, खडी मशीन भाग व डोंगर पाडा परिसरात पाणी साचल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते.
कळवा व मुंब्र्यात काही ठिकाणी महापालिकेने नेमलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ठेकेदारांनी गटारे व नाले व्यवस्थित साफ करून न घेतल्याने त्याचा पहिल्याच पावसात फटका नागरिकांना बसल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600