जिल्हा
नवी मुंबईत १३ दिवसांत १४८ वृक्ष कोसळले
नवी मुंबईत १३ दिवसांत १४८ वृक्ष कोसळले
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : चेंबूर येथे शाळेजवळ स्कूल बसवर वृक्ष कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर नवी मुंबई शहरातील धोकादायक वृक्षांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मागील १३ दिवसांत तब्बल १४८ वृक्ष कोसळल्याच्या घटनांची अधिकृत नोंद झाली आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबई शहरात मान्सून पूर्व कामांचा आढावा घेऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मनपा आयुक्त देत असतात. यात मान्सूनपूर्व नालेसफाई, धोकादायक वृक्षांची गणना करून ते तोडणे, किंवा छाटणी करणे, विद्युत विषयक कामांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र मनपा आयुक्त देत असलेले आदेश हे फक्त कागदावरच दिसत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. नवी मुंबईत आजही अपुऱ्या नाले सफाईअभावी रस्ते जलमय होत आहेत. तर विद्युत कामात हलगर्जी केल्याने नेरूळमध्ये दोन मुलींना वीजेचा धक्का लागल्याची घटना घडली. हीच अवस्था उद्यान विभागात आहे. उद्यान विभागाने देखील धोकादायक झाडांचा अहवाल तयार करून त्यांना तोडणे अथवा छाटणी करणे क्रमप्राप्त आहे. मात्र मागील १३ दिवसांपासून नवी मुंबई शहरात झाडे पडण्याची संख्या पाहता उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
नवी मुंबईत मागील १३ दिवसांत एकूण १४८ झाडे कोसळली असून बुधवार १ जुलै २०२६ रोजी या एकाच दिवशी तब्बल ३२ ठिकाणी वृक्ष व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईत झाडे कोसळण्यच्या घटना पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील रस्त्यांच्या कडेला धोकादायक अवस्थेत असलेल्या झाडांची तातडीने छाटणी करण्याची मागणी अभिनेते विनोद रोकडे यांनी केली असून वेळेत उपाययोजना न केल्यास चेंबूरसारखी दुर्दैवी घटना नवी मुंबईतही घडू शकते, असा इशाराही रोकडे यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600