जिल्हा
एपीएमसीत केसर आंब्याच्या पेटीला १७ हजार रुपये दर!
एपीएमसीत केसर आंब्याच्या पेटीला १७ हजार रुपये दर!
फोटो: ठाणे वैभव
यंदा हापूसच्या आधी केसर आंब्यांनी साधला मुहूर्त
नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी फळ बाजारात दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात कोकणातील देवगड येथील हापूसच्या मुहूर्ताची पहिली पेटी दाखल होते. यंदा मात्र हापूस हंगामाला विलंब होणार असून कोकणातील केसर आंब्यांनी मात्र हापूसच्या आधीच मुहूर्त साधला आहे.
सोमवारी एपीएमसी बाजारात केशर आंब्याची पाच डझनाची पहिली एक पेटी दाखल झाली आहे. ही पहिली पेटी १७ हजार रुपये दराने विक्री झाली आहे.
दरवर्षी हापूस आंब्याची मार्चमध्ये आवक वाढण्यास सुरुवात होते तर जानेवारी-फेब्रुवारीपासून हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे खवय्यांना हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागते. मात्र त्याआधी एपीएमसी बाजारात देवगड, रत्नागिरी येथील आसपासचा हापूस बाजारात दाखल होत असतो. मागील वर्षी देवगड येथील शिंदे कुटुंबीयांनी २१ नोव्हेंबर २०२४ ला एपीएमसी बाजारात पहिली पेटी पाठवून मुहूर्त साधला होता.
यंदा हापूसला मोहोर फुटण्याची वेळ आणि अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी तसेच हवामान बदल आणि थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव यामुळे फळधारणा झाली नाही तर मोहोरही गळून पडला आहे. त्यामुळे यंदा बाजारात हापूस विलंबाने दाखल होणार आहे. मात्र यावेळी हापूस आधीच कोकणातूनच केसर आंब्याने नंबर लावत आंबा हंगाम सुरु करण्याचा मान पटकावला आहे.
सोमवारी देवगड तालुक्यातील वाघोटनमधील शेतकरी शकील मुल्ला यांनी आपल्या
शेतातील केसर आंब्याची पाच डझनची पहिली पेटी बाजारात एन.डी. पानसरे अँड सन्स यांच्याकडे पाठवली होती. एपीएमसीत हापूसची पहिली पेटी दाखल होताच विधिवत पूजा करून हापूस हंगामाचे स्वागत केले जाते. यंदा केसर आंबा पहिला दाखल झाल्याने त्याची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच या आंबा हंगामातील पहिल्या पेटीला १६ ते १७ हजार रुपये बाजार भाव मिळाला आहे. आठ-आठ दिवसांनी या केशर आंब्याची बाजारात आवक सुरू राहील, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600