जिल्हा
इन्फ्ल्युएंझाचे २५ रूग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क
समन्वयासाठी वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टरांचा व्हॉट्सॲप ग्रुप
ठाणे: ठाणे शहरात गेल्या १५ दिवसांत इन्फ्ल्यूएंझाचे २५ रूग्ण सापडले असून आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. दरम्यान समन्वयासाठी वैद्यकीय अधिकारी आणि सर्व खासगी डॉक्टरांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या १५ दिवसात एच३एन२ (इन्फ्लुएन्झा) च्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एच३एन२ (इन्फ्लुएन्झा) ची कोणतीही लक्षणे दिसू लागली तर चाचणीच्या निकालाची वाट न पाहता तत्काळ उपचार सुरू करण्याच्या सूचना शहरातील सर्व डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, नागरिकांनीही कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन आयुक्त श्री. बांगर यांनी केले आहे.
बरेच नागरिक आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर सर्वप्रथम खाजगी डॉक्टरांना संपर्क करतात. त्यांच्याकडून योग्य उपचार मिळाले नाही तर पुढे गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी खासगी डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरी आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांनी खासगी डॉक्टरांचे व्हॉटसॲप ग्रुप बनविले असून त्याद्वारे खासगी डॉक्टरांशी समन्वय ठेवला जात आहे. तापाचा रुग्ण आल्यानंतर कोणती कार्यवाही करावी याची मार्गदर्शक प्रणाली तयार करुन ती सर्वच खाजगी डॉक्टरांना वितरित केली असून जर एखादा रुग्ण एच३एन२ लक्षणाचा आढळून आला तर त्वरीत संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
इन्फ्लुएन्झाची लक्षणे
सौम्य ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, धाप लागणे, छातीत दुखणे, खोल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर - काळी पडणे, मुलांच्यामध्ये चीडचीड.
इन्फ्लुएन्झा टाळण्यासाठी हे करावे
वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावे. पौष्टिक आहार घ्यावा. धूम्रपान टाळावे. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा.
हे करू नका
हस्तांदोलन टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेवू नये. आपल्याला फ्लू सदृश लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600