महाराष्ट्र
सूर्या योजनेतून मीरा-भाईंदरसाठी ४० दशलक्ष लिटर पाणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
भाईंदर: मीरा-भाईंदर शहराला सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेतून ४० दशलक्ष लीटर पाणी आगामी गणेशोत्सवापूर्वी दिले जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहे.
मंगळवारी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मिरारोड येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
ठाणे लोकसभा जागेवर महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के
निवडणूक लढत आहे. त्यामुळे मिरा भाईंदर भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेचे आयोजन माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केले.
याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, माजी आमदार रविंद्र फाटक, पीपीआई पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे उपस्थितीत होते.
गेल्या काही वर्षात मीरा-भाईंदर शहरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीरपणे जाणवू लागला आहे. यावर उपाय म्हणून पालघरच्या सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेतून मीरा-भाईंदरसाठी राज्य शासनाने २१८ दशलक्ष लीटर पाणी मंजुर केले आहे. त्यानुसार मागील चार वर्षापासून या प्रकल्प योजनेच्या जलवाहिन्या अंथरण्याचे काम केले जात आहे. मात्र विविध कारणामुळे हा पाणी पुरवठा लांबणीवर जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहराला एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या २१५ दशलक्ष लीटर पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.
दरम्यान मंगळवारी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मीरा रोड येथे आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या गणेशोत्सवपूर्वी पहिला टप्प्यात ४० दशलक्ष लीटर पाणी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600