जिल्हा
ब्लॅकलिस्ट कंपनीला ७२ कोटींची रस्त्यांची कामे
भाजपच्या माजी नगरसेविकेचा आरोप, आयुक्तांना पत्र
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु असून यामध्ये ७२ कोटींची रस्त्यांची कामे एका ब्लॅकलिस्ट असलेल्या कंपनीला देण्यात आली असल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविकेने केला आहे.
ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून 605 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या 282 रस्त्यांची कामे प्रभाग समितीनिहाय सुरू आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या निधीतून, सरकारी योजनांमधून आणि इतर प्राधिकरणांमार्फत रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली आहे. ही कामे गुणवत्तापूर्ण असावीत, वेळेवर पूर्ण व्हावीत याबाबत आयुक्त बांगर यांनी कार्यकारी अभियंत्यांना निर्देश दिले आहेत. याशिवाय झालेल्या रस्त्यांच्या कामांचे आयआयटीकडून ऑडिट करण्याचेही स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
रस्त्यांच्या कामांबाबत स्वतः आयुक्त संवेदनशील असताना आता एका ब्लॅकलिस्ट कंपनीला ७२ कोटींच्या रस्त्यांची कामे देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला आहे. सदरची कंपनी काळ्या यादीत होती, तरीही आयुक्तांनी या कंपनीला रस्त्यांची कामे का दिली? अजुनही या कंपनीमार्फत रस्त्यांची 72 कोटींची कामे चालू आहेत आणि अतिशय निकृष्ट दर्जाची ही कामे आहेत, असाही आरोप पेंडसे यांनी केला आहे. या कंपनीला कोणाचा वरदहस्त आहे? तत्काळ या कंपनीचे काम थांबवून झालेल्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी पेंडसे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600