महाराष्ट्र
वाहकांअभावी ९४ बस आगारात पडून; १७ बस भंगारात
ठाणे : टीएमटीच्या ताफ्यातील जुन्या ९४ बस वाहक उपलब्ध नसल्याने आगारात खितपत पडल्याचे समोर आले आहे. यातील १७ बस भंगारात गेल्या असल्याची कबुली टीएमटी प्रशासनाने दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने मागील वर्षी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ४२७ कोटी १९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता ७१८ कोटी ७४ लाख इतक्या अर्थसंकल्पाला ठाणे मनपा प्रशासनाने मंजुरी दिली. यात पहिल्या टप्प्यात २६० कोटी अनुदानाची तरतुद पालिकेने केली आहे.
टीएमटीच्या ताफ्यात सद्यस्थितीत एकुण ५४६ बस असून यातील ९४ जुन्या बस टीएमटीच्या मालकीच्या तर, ११५ एसी, ११० स्टँडर्ड, ९० मिडी बस, ‘जेएनयूआरएम’ मधील नवीन आणि जुन्या ४५ बस, ५० महिला तेजस्विनी बस अशा एकूण ४१० बस भाडेतत्त्वावर आहेत. मागील काही काळात टीएमटीमधील अनेक कायम कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे, वाहकांचा तुटवडा भासत असून वाहक उपलब्ध नसल्याने ९४ जुन्या बस आगारात खितपत पडल्या आहेत. यातील १७ बस उभ्या उभ्याच भंगारात जमा झाल्या आहेत.
सवलतीमुळे प्रतीवर्षी १८ कोटींचा फटका
ठाणे परिवहन सेवेचे चाक आधीच खोलात आहे. त्यातून सावरण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून विविध उपाययोजना आखल्या जात असताना ठाणे पालिका क्षेत्रातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर महिलांना प्रवासात ५० टक्के सूट देण्यात येत असल्याने उत्पन्नात प्रतीवर्षी १८ कोटींचा फटका बसत आहे. ही सूट लागू होण्यापूर्वी ठाणे परिवहन सेवेचे दिवसाचे उत्पन्न ३० ते ३१ लाखांच्या आसपास होते, ते निम्यावर आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600