महाराष्ट्र
आरटीईअंतर्गत ९५९७ विद्यार्थ्यांना ६४३ शाळांमध्ये मिळणार प्रवेश
ठाणे : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीची सोडत ७ जून रोजी काढण्यात आली तर निवड यादी २० जुलै २०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीनुसार ठाणे जिल्ह्यासाठी ६४३ शाळांमध्ये ९५९७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ६४३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ११,३३९ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांकडून महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक ७ जून २०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी शनिवारी, दिनांक २० जुलै २०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ६४३ पात्र शाळांमध्ये एकूण १९,५६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९५९७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार २२ जुलै २०२४ पासून एसएमएस येण्यास सुरुवात होणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600