जिल्हा
ठामपा अधिकाऱ्याच्या गाडीत दारूची पार्टी?
ठामपा अधिकाऱ्याच्या गाडीत दारूची पार्टी?
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीत खुलेआम दारुपार्टी सुरु होती. एका जागरूक पत्रकाराच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी या पार्टीचे चित्रीकरणही केले. त्यावेळी चालकाने गाडी वेगाने मुख्यालयाबाहेर हाकली. त्यामुळे प्रवेशद्वाराचे किरकोळ नुकसान झाले असले तरी सुरक्षा रक्षकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. या प्रकारामुळे महापालिकेची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
महापालिका मुख्यालयात पालिकेचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या गाड्या उभ्या असतात. त्यापैकी महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गाडी (एमएच ०४ केयू २३२३) उभी होती. या गाडीत चालक आणि इतर एक इसम भरदिवसा उघडपणे गाडीतच बियर पित बसले होते. हा प्रकार तिथून जाणारे पत्रकार प्रफुल्ल वाघोले यांच्या निदर्शनास आला. त्यांनी या घटनेचे चित्रीकरण केले. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना पालिकेने गाडी दिलेली असताना ते भाडे तत्वावर गाडी वापरत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची सर्व माहिती पत्रकारांनी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना तत्काळ दिली. दरम्यान हा सर्व प्रकार पालिका मुख्यालयातील सीसी टीव्हीत चित्रित झाला असल्याने संबंधित अधिकारी आणि त्यांच्या चालकावर कोणती कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिकेची कारवाई
महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहनचालक सतीष तेटवार याला कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
आज ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहनचालक सतीष टेटवार तसेच खाजगी वाहनचालक विपुल बनकर हे वाहनामध्ये (क्रमांक एम एच ०४ के यु २३२३) कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन करत असल्याचे निदर्शनास आले.
प्रशासनाने या घटनेची तत्काळ दखल घेत संबंधित दोन्ही वाहनचालकांना तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
हा प्रकार अत्यंत गंभीर मानून सतीष टेटवार या वाहनचालकाला 16 फेब्रुवारी रोजीच्या प्रभावाने तत्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर विपुल बनकर हा खाजगी वाहनचालक असल्याने त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास कळविण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600