जिल्हा
हरित बदलापूरसाठी ऐतिहासिक पाऊल
हरित बदलापूरसाठी ऐतिहासिक पाऊल
फोटो: ठाणे वैभव
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासोबत सामंजस्य करार
बदलापूर : पर्यावरण संवर्धन, शाश्वत नागरी विकास आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी शहर उभारण्याच्या उद्देशाने बदलापूर नगरपरिषदने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासोबत शहराच्या सर्वांगीण हरित विकासासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला असून, या कराराअंतर्गत पुढील दहा वर्षांसाठी 'हरित बदलापूर विकास आराखडा-२०३५' तयार करण्यात येणार आहे.
बदलापूर नगरपरिषद आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात झालेला हा सामंजस्य करार केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण शहराचा शास्त्रीय, तांत्रिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून हरित विकास साधण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.
या कराराच्या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, वृक्ष प्राधिकरण तज्ज्ञ आदित्य गोळे, गटनेते शरद तेली, बांधकाम समिती सभापती रमेश सोळसे, आरोग्य समिती सभापती किरण भोईर, पाणीपुरवठा समिती सभापती शैलेश वडनेरे, नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत शहराचा पुढील दहा वर्षांचा सर्वसमावेशक हरित विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र हरित आराखडा विकसित केला जाणार आहे. शहरातील जैवविविधतेचा वैज्ञानिक अभ्यास, विद्यमान वृक्षांची नोंद, संरक्षण व शास्त्रीय संगोपन, तसेच भारतीय आणि स्थानिक वृक्षप्रजातींच्या लागवडीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
याशिवाय शहरात मोठ्या प्रमाणावर शहरी जंगले, ऑक्सिजन पार्क, जैवविविधता उद्याने आणि हरित पट्टे विकसित करण्याचे नियोजन आहे. प्रदूषणाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, शहरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे आणि उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक नियोजन करण्यात येणार आहे.
हवामान बदलाचा विचार करून पर्यावरणपूरक विकास धोरण तयार केले जाणार असून, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, मृदसंवर्धन आणि पर्यावरण शिक्षणामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, संशोधन, प्रशिक्षण, वृक्षप्रजातींची निवड आणि वैज्ञानिक सहकार्य डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तयार करण्यात येणारा सविस्तर अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर करून पर्यावरण, नगरविकास, वन, हवामान बदल, जैवविविधता आणि शाश्वत विकासाशी संबंधित विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शासकीय कृषी विद्यापीठ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी शहराचा वैज्ञानिक हरित विकास आराखडा तयार करण्यासाठी अशा प्रकारचा व्यापक सामंजस्य करार करण्याचा हा देशातील पहिल्याच उपक्रमांपैकी एक असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी, "'हरित बदलापूर' ही केवळ नगर परिषदेची योजना नसून संपूर्ण शहराची लोकचळवळ आहे. प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यापारी, औद्योगिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी या अभियानात सहभागी होऊन बदलापूरला महाराष्ट्रातील सर्वात हरित, स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्यासाठी योगदान द्यावे," असे आवाहन केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600