जिल्हा
पंतप्रधानांच्या नावाचे नियोजित ग्रंथसंग्रहालय कागदावरच
ग्रंथालय उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडे पैसेच नाहीत
ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नियोजित करण्यात आलेल्या मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाचा प्रस्ताव अद्याप कागदावरच असल्याचे उघड झाले आहे. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी एक कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथालय उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडे पैसेच नसल्याने हा प्रस्ताव अद्याप पुढे सरकू शकलेला नसून ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठाणे शहराला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. शहराचा लौकिक वाढविणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आणि ग्रंथालये शहरात आहेत. या लौकिकाला साजेसे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार होते. ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असे मध्यवर्ती ग्रंथालय उभे करून त्या ग्रंथालयाचे नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचे नियोजित करण्यात आले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ग्रंथसंग्रहालयाची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात हे ग्रंथसंग्रहालय कागदावरच असून ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ग्रंथालयाचा प्रस्ताव पुढे सरकू शकलेला नाही.
मोदींच्या नावाचे उभारण्यात येणारे ग्रंथसंग्रहालय विकासकामार्फत कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार होते. यासाठी साधारणपणे ३३ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत ग्रंथालय उभारण्याचा मानस होता. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय या लेखाशीर्षांतर्गत तब्बल एक कोटींची तरतूद तत्कालीन आयुक्तांनी केली. मात्र, बदली झाल्यानंतर नवीन आलेल्या आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष दिलेले नसल्याची बाब समोर आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात येणाऱ्या या ग्रंथसंग्रहालयात ई बुक, ऑडिओ बुक, लेखक वाचक संवाद, चर्चासत्रे, लिखाणासाठी पोषक वातावरण असे या ग्रंथालयाचे स्वरूप तयार करण्यात आले होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600