जिल्हा

ठामपावर भगवे वादळ घोंघावणार; दोषी अधिकाऱ्यांच्या घरी धडकणार!

ठामपावर भगवे वादळ घोंघावणार; दोषी अधिकाऱ्यांच्या घरी धडकणार!
ठामपावर भगवे वादळ घोंघावणार; दोषी अधिकाऱ्यांच्या घरी धडकणार! फोटो: ठाणे वैभव
मनसे-ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांविरुद्ध एल्गार ठाणे : ठाणे महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नावर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारला असून येत्या सोमवारी ठाणे महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. यापुढे ठाणेकरांच्या प्रश्नावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढा देणार असल्याचे जाहीर करून महापालिकेतील बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन यापुढे जाब विचारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. देशात सर्वोत्तम महापालिका असा नावलौकिक असलेल्या ठाणे महापालिकेचा देशात भ्रष्टाचारामध्ये पहिला क्रमांक लागला आहे. निविदा काढून काम न करताच करोडो रुपयांची बिले काढली जात आहेत. महापालिका कर्जबाजारी झाली आहे. अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याचा पाढा श्री विचारे यांनी वाचला. ठाण्यात वाहतूक कोंडीची प्रचंड समस्या निर्माण झाली आहे. दहा मिनिटांच्या अंतराकरिता एक-एक तास वेळ लागत असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे होते परंतु तरी देखिल ते ठाण्यासाठी धरण आणू शकले नाहीत, त्यामुळे ठाणेकरांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे, असा आरोप श्री. जाधव यांनी केला. ठाणे शहरात दहशत निर्माण केली जात आहे. अनेकांना धमकावून पक्षात घेतले जात आहे, परंतु मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत, त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात यापुढे रस्त्यावरील लढाई एकत्रित लढणार असून सोमवारी गडकरी रंगायतन ते महापालिका भवन असा भव्य मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखिल श्री. जाधव यांनी केले. ठाण्यातील राक्षसाबरोबर आम्ही यावेळी लढणार असल्याचे श्री. विचारे यांनी जाहीर केले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट निवडणुकीत एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असता आम्ही एकत्र दिसतो म्हणजे पुढे देखिल एकत्र राहू, असे श्री. विचारे यांनी स्पष्ट केले. मनसे नेते माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, रविंद्र मोरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाढवे, रेखा खोपकर, मनसेच्या समीषा मार्कंडे आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600