जिल्हा
पारसिक नगरमध्ये हवे नाट्यगृहाऐवजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
ठाणे : खाडीच्या पलिकडे झपाट्याने विस्तारलेल्या पारसिक नगरमधील मुलांना खेळाचे मैदानच उपलब्ध नसल्याने याच भागात नाट्यगृहासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर नाट्यगृहाच्या ऐवजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
शहरात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मैदाने अतिशय अपुरी असल्याने मुलांना खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही. त्या मैदानांची परिस्थिती देखील फारशी चांगली नाही. त्यामुळे सर्वच स्तरातून खेळाचे मैदान विकसित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ज्या झपाट्याने शहरीकरण होत आहे त्याच वेगाने ठाण्याच्या पलीकडे पारसिक नगर परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकवस्तीमुळे या परिसरातील लहान मुलांकरिता खेळण्याचे मैदान उपलब्ध नसल्याने या परिसरातील लहान मुले, स्थानिक नागरिक, तसेच लोकप्रतिनिधींनीकडून खेळाच्या मैदानाची मागणी सातत्याने होत आहे.
ठाणे शहरात मर्यदित स्वरूपात मैदाने आहेत .त्यामुळे शहरातील सर्वच मुलांची फार गैरसोय होत आहे. याशिवाय बऱ्याच मैदानांचा वापर हा खाजगी कार्यक्रमांसाठी किंवा फेस्टिवलसाठी केला जात असल्याने सुट्टीच्या दिवशीही मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होत नाही. तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मैदानांचा वापर केवळ खेळांसाठी करण्यात यावा, अन्य कार्यक्रमांना मैदान देण्यात येऊ नये असे आदेश दिले होते . मात्र आदेशाची अंमलबजावणी देखील प्रशासनाकडून फारशी गांभीर्याने घेतली गेलेली नाही .कळवा प्रभाग समिती क्षेत्रात स्वर्गीय मुकुंद केणी यांच्या माध्यमातून मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे पारसिक नगरमधील रहिवाशांसाठी देखील हक्काचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण व्हावे अशी मागणी इथले लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केली आहे.
पारसिक नगरमध्ये १२,७०० फूट आकाराचा भूखंड असून हा भूखंड नाट्यगृहासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. पारसिक नगरची लोकसंख्या पाहता या ठिकाणी एकही खेळाचे मैदान नाही. यासाठी या ठिकाणी नाट्यगृहाऐवजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारावे अशी मागणी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना भेटून केली असून आयुक्त या मागणीचा सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला खात्री आहे.-उमेश पाटील
शहरातील मैदानांची नावे
मैदाने क्षेत्रफळ (चौ.मी.मध्ये)
प्रताप सिनेमा समोरील मैदान: 3700
शांती नगर, १२ बंगला परिसर: 2600
कोपरी गांव,पालिका शाळेजवळील मैदान : 2132.72
मुंब्रादेवी पायथ्याशी असलेले मैदान: 1088.20
युनिवर्सल शाळा , ब्रम्हांड : 3940
एस जी एस शाळेसमोरील मैदान , घोडबंदर रोड : 3900
वाघबीळ , मैदान नं ६ : 7700
शिवाजी नगर , मुंब्रा: 12000
वृंदावन सोसायटी येथील मैदान : 4500
मनीषा नगर, कळवा : 4300
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600