महाराष्ट्र
प्रभागात मताधिक्य मिळाले तरच नगरसेवक पदाचे तिकीट
ठाण्यात विनोद तावडे यांचा माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना इशारा
ठाणे: लोकसभेतील मताधिक्यावरून पालिकेतील उमेदवारी ठरणार असून ज्या प्रभागातून मताधिक्य कमी येईल, त्या प्रभागात पालिकेच्या उमेदवारीवर गदा येऊ शकते, असा इशाराही तावडे यांनी दिला आहे.
नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची वरिष्ठ नेत्यांकडून नाराजी दूर करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या तिन्ही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढत नाराज होऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणुकीचे काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गुरुवारी ठाण्यातील भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली.
कोणत्या प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झाले, याचा सखोल अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच प्रभागातील संबंधित पदाधिकाऱ्याला आगामी निवडणुकीत उमेदवारी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या उमेदवारीवर गदा येईल, असा स्पष्ट इशाराच तावडे यांनी यावेळी दिला. आपण सर्वजण महायुतीमध्ये आहोत. महायुती आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आपण काम करायला हवे. त्यामुळे नाराजी बाजूला ठेवा आणि कामाला लागा, असा सल्ला देत त्यांनी पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असेही तावडे यांनी आवाहन केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600