जिल्हा
विना परवाना ॲप आधारित २० बाईक टॅक्सीवर कारवाई
विना परवाना ॲप आधारित २० बाईक टॅक्सीवर कारवाई
फोटो: ठाणे वैभव
आरटीओकडून ५० हजारांची दंडात्मक कारवाई
ठाणे: परवाना, नोंदणी किंवा व्यावसायिक परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या २० बाईक टॅक्सी चालकांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने ठाण्यात कारवाई करत ५० हजारापर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे.
या ऑपरेशनदरम्यान अनेक बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक वाहन नोंदणी, प्रवासी विमा संरक्षण नव्हते. बेकायदेशीररित्या मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून प्रवासी उचलणाऱ्या या दुचाकी चालकांमुळे कायदा, सुरक्षा आणि वाहतूक शिस्त धोक्यात आली होती. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वायुवेग पथक तयार करून कारवाई राबवली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
या कारवाईनंतर बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अनेकांनी अॅप्समधून स्वतःचे वाहन हटवल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच, अधिकृत पद्धतीने नोंदणी व परवाना घेऊनच प्रवासी सेवा द्यावी, अन्यथा अजून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
परवान्याशिवाय प्रवासी सेवा देणे हा कायद्याचा भंग असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक विमा नसतो, गाडी खासगी वापरासाठी नोंदलेली असते, त्यामुळे अपघात झाल्यास विमा कंपनी जबाबदारी घेत नाही, अशी माहिती हेमांगिनी पाटील यांनी दिली.
ठाण्यातील रिक्षा युनियनने या कारवाईचं स्वागत केले आहे. बाईक टॅक्सीचालक बिनधास्तपणे प्रवासी नेत होते. त्यांना ना परवाना होता, ना नियम. त्यामुळे प्रामाणिक वाहन चालकांचे मोठे नुकसान होत होते, असे एकता रिक्षा चालक-मालक सेनेचे सचिव सतीश भोसले यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600