जिल्हा
शाळा, रुग्णालयांजवळील अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई
शाळा, रुग्णालयांजवळील अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत पानटपऱ्या, चिकन/मटण दुकाने, चायनीज स्टॉल्स आणि तत्सम अतिक्रमणांविरोधात ठाणे महानगरपालिकेने आजपासून विशेष कारवाई मोहिम हाती घेतली आहे.
महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार वर्तकनगर आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून अनेक अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली.
सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका परिषा सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातील वाढत्या अनधिकृत अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त. सौरभ राव यांनी या अतिक्रमणांवर तातडीने प्रभावी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
मोहिमेच्या पहिल्या दिवशी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात ११ अनधिकृत पानटपऱ्या, आठ हातगाड्या आणि चार स्टील बाकडे हटविण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात १० अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करून परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील सुरक्षितता वाढविणे, वाहतूक आणि पादचारी मार्ग अडथळामुक्त ठेवणे तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त कायम राखणे हा आहे.
शहरातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रांमध्येही ही अनधिकृत पानटपऱ्यावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. अतिक्रमणांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची विनापरवानगी अतिक्रमणे उभारू नयेत, तसेच शहर स्वच्छ, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेच्या विशेष मोहिमेला सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
उपआयुक्त (अतिक्रमण) जितेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी परिमंडळ 3 उपआयुक्त दिनेश तायडे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दीपक झिंजाड यांच्या समन्वयातून करण्यात आली. या कारवाईचे नेतृत्व वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी, म्रुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त विजय कवळे यांनी केले. अतिक्रमण विभाग, प्रभागसमिती अधिकारी कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. दरम्यान ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600