जिल्हा
मुंब्य्रातील १२ नगरसेवक अजित पवार यांच्या पंक्तीला!
ठाणे: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन ठाण्यात झाल्यानंतर मुंब्र्यातील राष्ट्रवादीच्या १७ पैकी १२ नगरसेवकांनी नजीब मुल्ला यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या दावतला हजेरी लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जेवण केले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पहिल्या काही दिवसांमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीच्या बहूतेक सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निश्चय केला. मात्र आता या निश्चयालाच सुरुंग लागण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी ९ ऑगस्टला क्रांतीदिनी ठाण्यात राष्ट्रवादी पक्षकार्यालयाच्या उद्घाटनाला सुमारे अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित असल्याचा दावा खुद्द अजित पवार गटाचे प्रदेश सचिव नजीब मुल्ला यांनी केला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंब्य्रातून कार्यकर्त्यांनी खास बाईक रॅलीही काढली. याशिवाय कोपरी, वागळे, माजिवाडापासून जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. पण व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मोरेश्वर केणी आणि मिराज खान यांना पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हे दोन्ही माजी नगरसेवक मुंब्य्रातील आहेत. मुंब्रा हा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असल्याने चर्चेला उधाण आले. पण त्यानंतर झालेल्या जेवणावळीमुळे या चर्चेला खमंग फोडणी मिळाली आहे.
मुंब्य्रातीलच आणखी १२ नगरसेवक कार्यक्रमाला हजेरी न लावता थेट दावतसाठी नजीब मुल्ला यांच्या घरी पोहचले. तेथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद लुटत पुढची रणनिती आखली गेल्याचे समजते.
मुंब्रा हा आमदार आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावण्याचा पहिला प्रयत्न शिंदे गटाने केला. आता त्याला जोड राष्ट्रवादी अजित पवार गटाची मिळाली आहे. या मतदार संघातील १७ पैकी १४ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिल्याचा दावा केला जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600