महाराष्ट्र
एपीएमसीमधील सर्व इमारती धोकादायक
पर्यायी जागेअभावी गाळे धारकांचा जीव मुठीत
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही आवारातील सर्व इमारतींसह मॅफको मार्केट इमारत नवी मुंबई महापालिकेने धोकादायक घोषित केली आहे. येथील गाळे धारकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने यंदा देखील त्यांना जीव मुठीत धरून व्यवसाय करावा लागणार आहे.
मुंबईमधील मस्जिद बंदर येथे होणारी गर्दी पाहता शेतकरी आणि व्यापारी यांच्या सोयीसाठी १९८२ साली
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तुर्भे येथील सिडकोच्या १७५ एकर जागेत वसवण्यात आली. अल्पावधीतच आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी ओळख निर्माण झाली. मात्र येथील इमारतींचे बांधकाम निकृष्ट केल्याने अवघ्या २० वर्षातच या इमारती जीर्ण झाल्या. काही ठिकाणी छताचा भाग कोसळू लागला. धक्के तुटले, धक्क्यांच्या वरील भागातील प्लॅस्टर कोसळू लागले. इमारतीच्या खांबांना तडे जाण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नवी महापालिकेने सर्व प्रथम २००५ साली येथील कांदा-बटाटा मार्केटमधील इमारती धोकादायक घोषित केल्या, आता संपूर्ण कांदा बटाटा, फळ, भाजी, धान्य व मसाला मार्केटमधील सर्व इमारती तसेच मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारत व मॅफको मार्केट इमारत देखील धोकादायक घोषित करण्यात आली आहे. या इमारती पडून काही दुर्घटना घडल्यास त्यास नवी मुंबई महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, अशा सूचना नवी मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत.
तर मागील अनेक वर्षांपासून मनपामार्फत या इमारती धोकादायक घोषित करून देखील बाजार समितीने व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने येथील व्यापाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून व्यवसाय करावा लागत आहे.
याबाबत बाजार समितीचे कार्यकारी अभियंता सुरेश मोहाडे व कांदा बटाटा मार्केट सहाय्यक अभियंता मेहबूब व्यापारी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.
मागील वर्षी घडल्या दोन दुर्घटना
नवी मुंबई महानगर पालिकेने धोकादायक घोषित केलेल्या बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केटमधील एफ गल्लीत मागील वर्षी १७ जुलै २०२३ रोजी गाळ्याचा सज्जा कोसळला होता. मात्र हो घटना रात्री आठ वाजता घडली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कोणी जखमी किंवा जीवितहानी नाही. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी धान्य बाजारातील वाय गल्लीत सज्जा/छताचा काही भाग पडल्याची घटना घडून दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.
---------------------------------
संरचना परीक्षण करून अहवाल देण्यास टाळाटाळ ?
शहरातील ३० वर्षे जुन्या इमारतींचे
तज्ञ वास्तू विशारदांकडून तसेच नामांकित परीक्षण संस्थांकडून संरचना परीक्षण करून त्याचा अहवाल नवी मुंबई महानगर पालिकेकडे सादर करावा. अहवालात दुरुस्ती अथवा पाडकामाबाबत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशानुसार एपीएमसी बाजार समितीला वारंवार पत्र देऊन देखील बाजार समितीने येथील इमारतींचे संरचना परीक्षण केलेले अहवाल दिलेले नाहीत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त तथा तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600