महाराष्ट्र
लोकसभेच्या तिन्ही जागा महायुतीच जिंकणार !
१५ पक्षांची वज्रमूठ, येत्या रविवारी ठाण्यात भव्य मेळावा
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभेच्या तिन्ही जागांवर महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास महायुतीतील नेत्यांनी व्यक्त केला. येत्या रविवारी महायुतीचा मेळावा होणार असल्याचेही या बैठकीत जाहीर करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात १४ जानेवारी रोजी तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी पाच वाजता महायुतीतील १५ पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे.
ठाणे येथे महायुतीतील १५ पक्षांच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, भाजपाचे विभागीय सचिव हेमंत म्हात्रे आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यात १४ जानेवारी रोजी एकाच दिवशी मेळावे होणार आहेत. ठाणे येथील तलावपाळी जवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी होणाऱ्या मेळाव्यात तिन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राज्यात ४५हून जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह अन्य मित्रपक्ष सज्ज झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातही महायुतीचाच उमेदवार निवडून येईल, यात संशय नसल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांची वेळ उपलब्ध झाल्यास ते मेळाव्याला उपस्थित असतील, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600