जिल्हा
पदवी अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करता येणार
सी.डी.देशमुख प्रशिक्षण संस्थेचा मुंबई विद्यापीठासोबत करार
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने मुंबई विद्यापीठासोबत करार केला आहे. यामुळे विद्यार्थी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासोबत यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करू शकतात. यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करणे व उत्तीर्ण होणे याकरिता विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी चार क्रेडिट मिळणार आहेत.
महापालिका आयुक्त सौरभ राव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या करारानुसार, ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चार क्रेडिट देऊ करणारे कोर्सेस सुरू करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी निगडित कोर्स पूर्ण केल्यावर क्रेडिट मिळणार आहेत. यूपीएससीसाऱख्या परीक्षेची तयारी जेवढी लवकर सुरू करता येईल, तेवढे चांगले असते. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये थेट लाभ होईल, याची खात्री असल्याचे आय़ुक्त राव यांनी स्पष्ट केले.
या करारानुसार यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात उपलब्ध झाल्यास, विद्यार्थी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासोबत यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करू शकतात. यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करणे व उत्तीर्ण होणे याकरिता विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी चार क्रेडिट मिळणार आहेत. या तीन वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यूपीएससी या स्पर्धा परीक्षेबाबत अभ्यासक्रमाची तोंडओळख होणार आहे. स्पर्धा परीक्षचे एकूण स्तर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम करण्याची कार्यपध्दती, परीक्षेत यश संपादन करणेकरिता आवश्यक सर्व व्यक्तिमत्व कौशल्यांचा विकास करणे, प्रभावी लेखन कौशल्य आणि प्रभावी संभाषण कौशल्य विकसित करणे व इतर आवश्यक बाबीची माहिती, मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने आयुक्त सौरभ राव यांनी तर, मुंबई विद्यापीठाच्या वतीने रजिस्ट्रार डॉ. प्रसाद कारंडे यांनी या करारावर सह्या केल्या. सोमवारी सायंकाळी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याप्रसंगी, महापालिकेचे उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे, संस्थेचे संचालक महादेव जगताप, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600