जिल्हा
कर वसुलीच्या परीक्षेत अंबरनाथ नगरपालिका उत्तीर्ण
कर वसुलीच्या परीक्षेत अंबरनाथ नगरपालिका उत्तीर्ण
फोटो: ठाणे वैभव
९५ टक्के कर वसुली, १७.९६ कोटी रुपयांचा ऑनलाइन भरणा
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेने यंदा ९५ टक्के कर वसुलीचा टप्पा गाठला आहे. सलग चौथ्यांदा विक्रमी वसुली करण्यात आली आहे. यंदा चालू आर्थिक वर्षात नगरपालिकेच्या एकूण ५९.१० कोटींच्या मागणीपैकी ३१ मार्चपर्यंत ५५.५८ कोटी रुपयांची करवसुली करण्यात आली असून, वसुलीचे प्रमाण ९४.०४ टक्के इतके आहे.
या वसुलीत ऑनलाइन माध्यमातूनही १७.९६ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे अशी माहिती नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी दिली. नगरसेवक अभिजित करंजुले, उप मुख्याधिकारी उमेश राऊत, कर अधिक्षक नरेंद्र संख्ये, कर निरीक्षक प्रशांत राणे आदी यावेळी उपस्थित होते.
यंदा झालेल्या कर वसुलीत ४५ कोटी रुपये एमआयडीसीतून वसूल झाले आहेत. पालिकेच्या कर विभागाने सलग चौथ्यांदा कर वसुलीचा उच्चांक गाठल्याने नगराध्यक्षा करंजुले यांनी कर अधिकारी नरेंद्र संख्ये आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
अंबरनाथ शहराची लोकसंख्या सुमारे ४ ते ५ लाखांच्या दरम्यान असून शहरात सुमारे एक लाख ४२ हजार मिळकती आहेत तर दोन लाख २५ हजार कर बिले वितरित करण्यात आली होती. कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेने विविध उपक्रम राबवले होते. यामध्ये गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली तसेच कर विभागाच्या पथकांनी घरोघरी जाऊन कर वसुली केली. या मोहिमेत कर विभागातील कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, उप मुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे कर अधिकारी नरेंद्र संख्ये, प्रतीक्षा सावंत, कर निरीक्षक प्रशांत राणे, नवनीत देवरे यांच्या पथकाने शहरात ठिकठिकाणी गृहसंकुलांमध्ये विशेष कर वसुली कॅम्प, मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस, जप्तीचे अधिपत्र बजावून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. या उत्कृष्ठ कामगिरीमुळे नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी कर अधिकारी नरेंद्र संख्ये आणि त्यांच्या सहकारी यांचे अभिनंदन केले.
अपुरा कर्मचारी वर्ग, जागेची कमतरता असतानाही पालिका कर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर वसुलीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांनी प्रशंसा केली. पुढील वर्षी अधिकारी कर्मचारी ह्यांना भेडसावणाऱ्या त्रुटी दूर करण्यात येतील,असेही नगराध्यक्षा करंजुले यांनी सांगितले. यंदा सलग चौथ्या वर्षी विक्रमी मालमत्ता कर वसुली झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. कर विभागातील पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांनी देखील शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी येऊन कामकाजात भाग घेतल्याचे कर अधिक्षक नरेंद्र संख्ये यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या माध्यमातून लागू केलेल्या अभय योजनेचा देखील उत्पन्न वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा झाला. शहरातील काही सरकारी कार्यालयांचा कर वसूल झाला नसून त्याकडे देखील कर खात्यामार्फत पाठपुरावा करून कर वसुली केली जाईल, असे श्री. संख्ये यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600