जिल्हा
तलाव बुजवण्याचा प्रयत्न आला अंगलट
तलाव बुजवण्याचा प्रयत्न आला अंगलट
फोटो: ठाणे वैभव
* ओवळा हद्दीत वनविभागाची कारवाई
* जेसीबीसह एकजण ताब्यात
ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या घटना वाढत असून, त्यामुळे जैवविविधतेला आणि वन्यजीवांच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे. येऊर परिसरातील चेना वन परिक्षेत्रात अलीकडेच एका तलावात बेकायदेशीररीत्या दगड व माती भरून तो बुजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली.
ही घटना मौजे ओवळा येथील राखीव वनक्षेत्रात घडली असून, येथे सर्वे नंबर २७३/३ आणि वनखंड क्रमांक १०९ मध्ये असलेल्या नैसर्गिक तलावात जेसीबीच्या सहाय्याने माती व दगड टाकले जात होते. यामुळे या जलस्रोताचा नाश होण्याची शक्यता होती. अशा प्रकारे तलाव बुजवून भविष्यात तेथे बांधकाम अथवा इतर वापरासाठी जमिनीचा वापर होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता वन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
या प्रकरणी उपसंचालक प्रदीप पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन पथकाने कारवाई केली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तलाव बुजवणाऱ्या जेसीबी मशीनला रोखले एका व्यक्तीस ताब्यात घेतले असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मयुर सुरवसे यांनी दिली.
वन विभागाच्या कारवाईमुळे परिसरात अशा अतिक्रमणकारांमध्ये धडकी भरली असून, येऊर परिसरात सध्या वाढत्या अतिक्रमणामुळे जैवसाखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगलातील जलस्रोत हे वन्यजीवांसाठी जीवनरेषा असून, त्यांचा नाश होणे म्हणजे त्यांच्या अस्तित्वावरच संकट ओढावणे होय.
वन विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून, दोषींवर वन अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600