महाराष्ट्र
‘सीए’ अंतिम परीक्षेत नवी मुंबईचा अन्सारी देशात तिसरा
इंटरमिजिएट परीक्षेत भिवंडीचा कुशाग्र देशातून पहिला
मुंबई : सीए अंतिम परीक्षेत नवी दिल्लीतील शिवम मिश्रा देशात प्रथम, दिल्लीतील वर्षा अरोरा द्वितीय, तर मुंबईतील किरण मनराल आणि नवी मुंबईतील घिलमान अन्सारी यांनी तृतीय स्थान पटकावले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल गुरुवार, ११ जुलै रोजी जाहीर करण्यात आला.
सीए अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल २७.३५ टक्के, दुसऱ्या ग्रुपचा निकाल ३६.३५ टक्के लागला. तर दोन्ही ग्रुप मिळून १९.८८ टक्के निकाल लागला आहे. तर, इंटरमिजिएट परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल २७.१५ टक्के, तर दुसऱ्या ग्रुपचा निकाल १८.२८ टक्के आणि दोन्ही ग्रुप मिळून १८.४२ टक्के निकाल लागला आहे.
‘सीए’ अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपमधून ७४ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २० हजार ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून ५८ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २१ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुप मिळून ३५ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ७ हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीए अंतिम परीक्षेत नवी दिल्लीतील शिवम मिश्रा याने ८३.३३ टक्के मिळवत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यानंतर दिल्लीतील वर्षा अरोरा ८०.०० टक्के मिळवत द्वितीय स्थानी, तर मुंबईतील किरण मनराल आणि नवी मुंबईतील घिलमान अन्सारी यांनी ७९.५० टक्के मिळवत तिसऱ्या स्थान मिळवले.
दरम्यान, ‘सीए’ इंटरमिजिएट परीक्षेतील पहिल्या ग्रुपमधून १ लाख १७ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ३१ हजार ९७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून ७१ हजार १४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १३ हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुप मिळून ५९ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ११ हजार ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ‘सीए’ इंटरमिजिएट परीक्षेत भिवडी येथील कुशाग्र रॉय याने ८९.६७ टक्के मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तर अकोल्यातील युग करिया आणि भाईंदर येथील यग्य चांडक याने ८७.६७ टक्के मिळवत द्वितीय स्थान आणि नवी दिल्लीतील मनित भाटिया व मुंबईतील हिरेश काशिरामका यांनी ८६.५० टक्के मिळवत तिसरे स्थान पटकावले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600