जिल्हा
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे अश्विन मुद्गल यांनी १७ जून २०२६ रोजी स्वीकारली. सिडकोचे मुख्य कार्यालय असलेले सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे अश्विन मुद्गल यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली. सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी श्री. अश्विन मुद्गल हे एमएमआरडीए महामंडळात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते.
सन २००७ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या अश्विन मुद्गल यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरूवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हा दंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळ येथे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळले आहेत. अश्विन मुद्गल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत.
“सिडको हे देशातील अग्रगण्य नियोजन व विकास महामंडळांपैकी एक असून, सिडकोतर्फे राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे. सध्या सिडकोमार्फत साकारण्यात येत असलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहील,” असे श्री. मुद्गल यांनी सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600