जिल्हा
धावत्या लोकलमध्ये दिव्यांगाला जाळण्याचा प्रयत्न
ठाणे : धावत्या रेल्वेत एका दिव्यांगाला गर्दुल्ल्याने जाळल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या हल्ल्यात दिव्यांगाचा डावा हात पूर्णपणे होरपळला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या ठाणे लोहमार्ग पोलिसांचे पथक रुग्णालयात असून जखमीचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
प्रमादे वाडेकर (३५) असे जखमीचे नाव आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलमध्ये दिव्यांगांच्या राखीव डब्यातून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान लोकल कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान येताच एका गर्दुल्याने नशेसाठी वापरण्यात येणारे सोल्युशन रुमालावर टाकून त्याला आग लावली. आणि जळता रुमाल त्या गर्दुल्याने अंगावर फेकल्याने प्रमोद वाडेकर याचा डावा हात संपूर्णपणे होरळपला.
या घटनेत प्रमोद वाडेकर यांचा हाताला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना प्राप्त होताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रमोद यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या ठिकाणी बेड उपलब्ध नसल्याने प्रमोद यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर गर्दुल्ल्या आरोपीने पळ काढला असून लोहमार्ग पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. लोहमार्ग पोलिसांनी या गर्दुल्ल्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. आरोपी गर्दुल्ल्याच्या वर्णानुसार त्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पंढरी कांदे यांनी दिली.
दिवसेंदिवस लोकल आणि स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा त्रास वाढत चालला आहे. लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बलाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः मुंब्रा रेल्वे स्थानक आणि परिसरात प्रवाशांवर दगडफेक, चालत्या गाडीत प्रवाशांच्या हातावर मारणे असे प्रकार वाढत चालले आहेत. सुविधांचा विचार करताना प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्राधान्याने विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600