जिल्हा
सिलिंडर पेटवून पोलिसांवर आगीने हल्ला करण्याचा प्रयत्न
पोलिसांची दुचाकी जळाली
ठाणे: पती पत्नीच्या भांडणात मदतीसाठी धावून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर एका व्यक्तीने सिलिंडरचा पाईप पेटवून पोलिसांच्या दिशेने आगीच्या ज्वाला आणि दगडफेक केल्याची घटना रविवारी माजिवड्यात उघडकीस आली आहे. यात पोलिसांची दुचाकी जळाली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजिवडा भागातील साईनाथ नगर येथे संबंधित व्यक्ती त्याच्या पत्नी आणि आईसोबत राहतो. रविवारी तो त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करत होता. याबाबतची माहिती त्याच्या आईने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी दुचाकीने निघाले. पोलीस घटनास्थळी पोहचताच, त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. पोलिसांनी महिलेला विचारले असता, तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस येण्यापूर्वी त्याने तिला जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु लाईटर पेटले नसल्याने तिचा जीव वाचला. त्यानंतर
पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे त्याने दगड तसेच मिळेल त्या वस्तू पोलिसांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. तो दगड उचलू लागल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एका टेम्पोचा आडोसा घेतला. त्याचवेळी त्या व्यक्तीने घरात प्रवेश करून शेगडीपासून विलग केलेला सिलिंडर बाहेर आणला. त्याने त्याच्याकडील लाईटरने गॅस सिलिंडर जोडलेल्या पाईपच्या दर्शनी भागात पेटवून आगीच्या ज्वाला पोलिसांच्या दिशेने सोडल्या.
त्यानंतर सिलिंडर स्थानिक रहिवाशांच्या अंगावर फेकण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या दुचाकीचा आडोसा घेतला. त्यानंतर त्या व्यक्तीने थेट त्या दुचाकीलाच पेटवून दिले. पोलिसांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले.
या प्रकारानंतर त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती कापूरबावडी पोलिसाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक देखील तेथे पोहचले. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600