जिल्हा
पगार रखडल्याने बदलापूर पालिका कर्मचाऱ्यांचा ठिय्या
पगार रखडल्याने बदलापूर पालिका कर्मचाऱ्यांचा ठिय्या
फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: बदलापूर नगरपरिषदेत गेल्या चार महिन्यांपासून पगार वेळेवर होत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी परिषदेच्या लेखा विभागात ठिय्या मांडून पालिका प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
बदलापूर नगर परिषदेतील भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे युनिट अध्यक्ष विनोद वाल्मिकी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेत ठिय्या मांडला. दुपारी २.३०च्या सुमारास वाल्मिकी व नगर परिषदेतील कर्मचारी वेळेवर पगार होत नसल्याबाबत जाब विचारण्यासाठी लेखा विभागात गेले. परंतु लेखा अधिकारी विकास चव्हाण हे दालनात नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी लेखा विभागात ठिय्या मांडला. पूर्वी आम्हाला दर महिन्याच्या एक तारखेला पगार मिळत होता. परंतु गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पगाराची तारीख लांबत चालली आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज घेतलेले आहे, तर अनेक कर्मचाऱ्यांनी घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तू, मोबाईल आदी वस्तू कर्जावर घेतल्या आहेत. त्याचा ईएमआय दर महिन्याच्या एक, दोन तारखेला जात असतो. परंतु गेल्या चार महिन्यांपासून पगार या तारखेत होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे ईएमआय बाऊन्स होऊन त्याचा आर्थिक भुर्दंड कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ठेकेदारांच्या कामांच्या बिलांचे पेमेंट वेळच्यावेळी केले जाते, मग पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नगर परिषदेकडे पैसे का नाहीत? असा सवाल विनोद वाल्मिकी यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600