जिल्हा

सुशोभीकरणामुळे कावेसर तलावाची जैवविविधता नष्ट होणार

सुशोभीकरणामुळे कावेसर तलावाची जैवविविधता नष्ट होणार
सुशोभीकरणामुळे कावेसर तलावाची जैवविविधता नष्ट होणार फोटो: ठाणे वैभव
ठाण्यातील तलावांचे ऑडीट करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी ठाणे: १५० वर्षे जुन्या कावेसर तलावाचे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणामुळे तलावातील आणि तलाव परिसरातील जैवविविधता नष्ट होणार आहे तर सिद्धेश्वर तलावासह अन्य तलावांमध्येही प्रदूषणाची स्थिती निर्माण झाली असून ठाण्यातील सर्व तलावांचे ऑडिट करण्याची मागणी धर्मराज्य पक्षाने पालिका प्रशासनाकडे केली आहे. कावेसर तलावाच्या परिसरात, अत्यंत जुनी झाडे असून, अनेक स्थलांतरित पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, विविध प्रकारची फुलपाखरे, ड्रॅगनफ्लाय, मधमाशा आणि अनेक दुर्मिळ कीटक यांचा मूळ अधिवास आहे. कावेसर तलावाच्या प्रस्तावित सुशोभीकरणामुळे, भविष्यात पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, येथील मूळ अधिवासातील वन्यजीव धोक्यात येण्याची दाट शक्यता असल्याने, नैसर्गिक जैवविविधता आणि जीवसृष्टींचे प्रमाण तपासण्यासाठी, ठाणे शहरातील सर्व तलावांचे ऑडीट करण्याची मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, वाढत्या मानवी रहदारीमुळे कावेसर तलावाचा परिसर प्रदूषित होणार तर आहेच, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बहुसंख्य तलाव आणि तेथील सुशोभीकरणाचा पूर्वानुभव पाहिल्यानंतर, कावेसर तलाव धोक्यात येऊन, निसर्ग आणि पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप-प्रादेशिक अधिकारी यांना पत्र लिहून, मे महिन्यात सलग तिसऱ्यांदा, सिद्धेश्वर तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची आठवण करुन देत, सिद्धेश्वर तलावाच्या संपूर्ण काठावर, अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केलेल्या प्रदूषणामुळेच, तलावातील माशांचा मृत्यू झालेला असून, ठाणे महानगरपालिकेचे प्रदूषणमुक्तीचे सर्वप्रकारचे प्रयत्न फोल ठरले असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच, ठाणे शहरातील घोसाळे तलाव हा, दुर्मिळ कासवांचे नंदनवन मानला जातो. त्यामुळे, या तलावातील कासवांचे संवर्धन करुन, घोसाळे तलाव कासवांसाठी संरक्षित म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती, याकडेही नितीन देशपांडे यांनी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप-प्रादेशिक अधिकाऱ्यांचे, आपल्या पत्रातून लक्ष वेधले आहे. दरम्यान, याआधीच विकासाच्या नावाखाली, ठाणे शहराची काँक्रीटच्या वाढत्या जंगलांमुळे वाताहत झालेली असतानाच, निदान यापुढे तरी, ठाणे शहरातील जो काही उरला-सुरला निसर्ग आहे, तो अबाधित ठेवण्यासाठी, वृक्षतोडीवर कायमस्वरुपी बंदी आणण्यासोबतच, सुशोभिकरणाच्या नावाखाली, तलाव परिसरातील कॉंक्रीटीकरण पूर्णतः बंद करावे, ठाणे शहरातील सर्व तलावपरिसरातील जैवविविधतेचे योग्य ते मॅपिंग करुन, बेसलाईन डाटा तयार करावा. पाणथळ जागेच्या बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ नये याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व तलावांतील नैसर्गिक जैवविविधता व तलावांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्वप्रकारच्या जीवसृष्टीचे प्रमाण, याचे तत्काळ ऑडीट करुन, ते ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करतानाच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिक व पर्यावरणप्रेमींच्या माहितीसाठी ते प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रकाशित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रातून शेवटी केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600