महाराष्ट्र
कल्याण पुर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा
मुख्यमंत्र्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण
कल्याण : कल्याणमध्ये उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील, एक ऊर्जा देत राहील अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरामध्ये साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शानदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाबासाहेब एवढे शिकले की पुस्तक हे त्यांचे आयुष्य होते. आजही त्यांच्या कार्याचा विचारांचा जगभर अभ्यास केला जातो हे अभिमानास्पद आहे. त्यांनी मानव मुक्तीचा समानतेचा लढा उभा केला. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभे केलेले कार्य पूर्ण विश्वाला मार्गदर्शक असेच राहिले आहे. आणि आपली जी घटना आहे ती जगातली सर्वोत्तम भारताची घटना, बाबासाहेबांनी लिहिली आहे. त्याच्यावरच आपल्या देशाचा कारभार आपल्या राज्याचा कारभार सुरू असल्याचे सांगत " हम भी है बाबासाहेब के बंदे,नाम है मेरा एकनाथ शिंदे" अशा शायराना अंदाजमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
कल्याण पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी येथील गेल्या 15 वर्षांपासून केली जात होती. नागरिकांच्या याच मागणीचा विचार करून साधारणपणें तीन वर्षांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्मारकाच्या उभारणीचे काम हाती घेतले. मात्र यासाठी अस्तित्वात असणारी जागा दुसऱ्या प्रयोजनासाठी आरक्षित असल्याने शासकीय प्रक्रिया करून जागेच्या आरक्षणात फेरबदल करणे गरजेचे होते. आणि राज्य सरकारनेही अतिशय विक्रमी वेळेत हे आरक्षणातील फेरबदल करून दिले. तसेच हे स्मारक अधिक भव्य पद्धतीने उभारावे यासाठी विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती.
नगरविकास विभागाकडूनही यासाठी तत्काळ मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींच्या पूर्ततेनंतर आज हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
कडोंमपाच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरामध्ये १३०० चौरस मीटर जागेवर भव्य स्मारक उभारले जात आहे. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन, स्मारकांच्या भिंतींवर थ्री डी चित्र, ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो आणि सांस्कृतिक समारंभासाठी स्मारक परिसरात भव्य सभागृह अशी संरचना आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णा रोकडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, स्थानिक लोकप्रतिनिधी निलेश शिंदे यांच्यासह हजारोच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600