जिल्हा

सैनिक होणं म्हणजे बलिदान नसून देशासाठी जगणं!

सैनिक होणं म्हणजे बलिदान नसून देशासाठी जगणं!
सैनिक होणं म्हणजे बलिदान नसून देशासाठी जगणं! फोटो: ठाणे वैभव
‘दृष्टी २०२५’मध्ये लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) ओमर पठारे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद वावीकर आय इन्स्टिट्यूट व 'ठाणेवैभव' यांचा संयुक्त उपक्रम ठाणे: देशसेवेचा अर्थ केवळ शौर्य किंवा बलिदान नसून, राष्ट्रासाठी मूल्याधारित जीवन जगण्याची जबाबदारी आहे, असा प्रेरणादायी संदेश लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) ओमर पठारे यांनी ठाण्यातील विद्यार्थ्यांना दिला. वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दृष्टी २०२५’ या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात त्यांनी आपल्या अनुभवांतून सैनिक जीवनाची खरी बाजू उलगडत तरुणांना देशसेवेच्या वाटेवर विचारपूर्वक पाऊल टाकण्याचे आवाहन केले. आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडताना ओमर पठारे यांनी लहानपणीचा एक किस्सा सांगितला. त्यांच्या मस्तीखोर स्वभावाला वैतागून आईने एकदा त्यांना मागच्या गल्लीतील रद्दीवाल्याकडून काही पुस्तके आणायला पाठवले. तिथेच त्यांना ‘कमांडो कॉमिक’ हे कॉमिक सापडले. दुसऱ्या महायुद्धातील शौर्यगाथा, सैनिकांचे धैर्य आणि देशभक्तीने भारावून गेलेले ते कॉमिक त्यांनी जवळपास दोन वर्षे सातत्याने वाचले. “खरं तर माझा आर्मीचा प्रवास तिथूनच सुरू झाला,” असे ते सांगतात. आई डॉक्टर असतानाही, त्यांनी आर्मीमध्ये भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. १९७८ साली औरंगाबाद येथील एका इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी एसएसबी परीक्षा व मुलाखत यशस्वीरीत्या पार केली. पुण्यातील खडकवासला येथील एनडीएमध्ये तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अधिकारी म्हणून दाखल झाले. आयएमएमधील प्रशिक्षण काळातच कारगिल युद्ध सुरू झाले होते. वेगवेगळ्या प्रांतातील सैनिकांसोबत काम करताना ते शिस्त, समर्पण आणि नेतृत्वाचे खरे अर्थ शिकले. “ऑफिसर असूनही जवानांचा विश्वास जिंकावा लागतो. त्यांच्यासोबत सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक कृतीत सहभागी व्हावं लागतं,” असे ते म्हणाले. मराठी असूनही घरच्यांना आपण सरदार असल्यासारखे वाटायचे, इतका तो संस्कार अंगवळणी पडल्याचे त्यांनी हसत सांगितले. सीमेवरील अनुभव सांगताना त्यांनी युद्धातील माणुसकीवर भर दिला. “रागावर नियंत्रण ठेवणं, निरपराध नागरिकांचे संरक्षण करणं आणि पकडलेल्या महिलांशी सन्मानाने वागणं हे सैनिकाचं कर्तव्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडून येणाऱ्या फोन कॉल्सचा उल्लेख करताना ते भावूक झाले. “आमच्या मुलाने चांगलं काम केलं ना?” हा प्रश्न सैनिकांच्या त्यागाची खरी किंमत सांगून जातो, असे त्यांनी नमूद केले. सैनिक क्षेत्रात केवळ सीमारेषेवरच नव्हे, तर विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना प्रेरित केले. “सैनिकाचं एकच धोरण असतं, आधी देश, मग आपली माणसं आणि शेवटी आपण स्वतः!” असे ते म्हणाले. हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी, माजिवडा, ठाणे पश्चिम येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडला. यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ व व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600