महाराष्ट्र
ठाणे जिल्ह्यात ४५,४२,६७३ लाभार्थ्यांना लाभ
शासन आपल्या दारी उपक्रम
ठाणे: शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हयात 15 एप्रिल 2023 पासून आतापर्यंत एकूण 45 लाख 42, 673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदान, कल्याण शिळफाटा, कोळे, कल्याण येथे करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, हे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. एकदा आवाहन केल्यानंतर जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी जोमाने कामाला लागले. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले.वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली. यातून समृध्दी महामार्ग, अटल सेतू मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आणला.
ते म्हणाले, स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला क्रमांक एक चा पुरस्कार मिळाला. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. यामुळे प्रदूषण झपाट्याने कमी होत आहे. हे सरकार दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे, यातूनच मराठा आरक्षणाचाही प्रश्न निकाली काढला. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्र सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेर होतोय वेगवान होतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला, आपल्या देशाला जगात सन्मान मिळवून देणारे, मान वाढविणारे प्रधानमंत्री लाभले आहेत. आपण भाग्यवान आहोत. नरेंद्र मोदींनी 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे.
बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी हे शासन आता ठाणे जिल्ह्यातही 6 व 7 मार्च रोजी "नमो महा रोजगार" मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे. या महारोजगार मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा, असे आवाहन करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही हे शासन जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करीत आहे. जनता "शासन आपल्या दारी" या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत आहे, जनतेला विश्वास वाटतो की, हे शासन खरोखर जनतेचे शासन आहे. हे शासन आपले दुःख ऐकून त्यावर उपाययोजना करणारे शासन आहे.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथॊरे, आमदार कुमार आयलानी, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार शांताराम मोरे, आमदार गीता जैन, आमदार मनिषा कायंदे, आमदार राजू पाटील, माजी आमदार रविंद्र फाटक, एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त संजय मुखर्जी, सिडको चे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सर्व महापालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातील "शासन आपल्या दारी" उपक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ.अमोल शिंदे, विकास आवटी, मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600