जिल्हा
ठाण्यात पावसाचे द्विशतक!
ठाण्यात पावसाचे द्विशतक!
फोटो: ठाणे वैभव
* सखल भागात दोन फूट पाणी तुंबले
* झाडे पडली, वाहनांचे नुकसान
ठाणे: काल रात्रभर पडत असलेल्या पावसाने ठाणेकरांची झोप उडवली असून दुपारपर्यंत शहरात सुमारे १८० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे झाडे उन्मळून पडली. अनेक सखल भागात पाणी तुंबले होते तर रात्री गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्यांच्या उत्साहहावर पाणी पडले आहे.
रविवारपासून पुढील तीन दिवस रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे शनिवारीच रात्रीपासून ठाणे शहरात पावसाने जोरदार बॅटींग सुरु केली. रात्री नऊ ते साडेनऊ सुमारास सुरू झालेल्या पावसाने रात्री साडेबारा दरम्यान दमदार हजेरी लावली होती. त्या तीन तासात तब्बल ८९.२४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.
हवामान विभागाने ठाण्यासह मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर येण्याची शक्यता वर्तविली आहे. शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या पाऊस सुरू झाला. काही क्षणात पावसाचा जोर चांगला वाढला होता. गडगडाटासह पाऊस कोसळत होता, त्यामुळे सखल भाग असलेल्या वंदना सिनेमा, मुख्य बाजारपेठ येथील पेढ्या मारुती मंदिर परिसर पाण्याखाली गेला होता. टेंभी नाका येथे जत्रा भरली असून जत्रेतील विक्रेत्यांचे सामान या पावसात वाहून गेले. त्यांच्या सामानाची नासधूस झाली. रात्री गरबा अनेक भागात बंद होता तर काही ठिकाणी उत्साही तरुण-तरुणी पावसातही गरब्याचा आनंद लुटत होते.
शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत एकूण ११५.७९ मिमी पाऊस नोंदवला गेला. तर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत (सात तासात) ६४.७७ मि.मी. पाऊस झाल्याने आतापर्यंत एकूण ३१३५.११ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
ठाणे शहरात चार ठिकाणी पाणी साचले तर तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामध्ये दोन रिक्षाचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर बऱ्याच प्रमाणात ओसरला होता.
मानपाडा टिकुजीनीवाडी येथील नीलकंठ ग्रीन सोसायटीची सुमारे १५० फूट लांब व २० फूट उंच संरक्षण भिंत पडली. त्या भिंतीलगत असलेली पाच ते सहा झाडे जवळच असलेल्या नाल्यामध्ये पडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून महापालिकेच्या संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत, सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावली आहे. दरम्यान कोपरी पूर्व या ठिकाणी सरस्वती नगरी सोसायटीची संरक्षण भिंत पडली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ढोकाळी नाका येथे रविवारी दुपारी सुटलेल्या वाऱ्यामुळे लोखंडी कमान पडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक कोंडीचे चित्र वारंवार पाहण्यास मिळत असताना, रविवारी पावसामुळे शहरात तुरळक प्रमाणात वाहतूक कोंडीचे चित्र दिसत होते. एकीकडे रेड अलर्ट जाहीर केल्याने नागरिकांनी शक्यतो बाहेर पडणे टाळले असेच म्हणावे लागले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600