जिल्हा
गणरायाच्या निरोपाला वरुण राजा अवतरला
गणरायाच्या निरोपाला वरुण राजा अवतरला
फोटो: ठाणे वैभव
* विसर्जनस्थळी गणेशभक्त गहिवरले
* ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील ४५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन
ठाणे: ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे ४५ हजार श्री मूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गुरुवारी गणेश भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी वरुण राजाने देखिल हजेरी लावली होती. वाजता-गाजत टाळ-मृदूंगाच्या आणि बँजोच्या तालावर नाचत, गुलाल उधळत गणपती बाप्पाचे ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा-अर्चा करून विसर्जन करण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेने १३४ ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. या तलावातच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने ठाणेकरांना केले होते. त्याला देखिल चांगला प्रतिसाद मिळाला होता. तलावपाळी, उपवन, वागळे येथिल रायलादेवी तलाव, पूर्व भागातील कृत्रिम तलाव, गायमुख, कोलशेत, कळवा, मुंब्रा खाडी, रेतीबंदर, कळवा तलाव आदी कृत्रिम विसर्जन केंद्रांवर भक्तांनी गर्दी केली होती.
विसर्जन केंद्रांवर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी महापालिकेने चोख व्यवस्था केली होती. त्याचबरोबर पोलिसांचा देखिल चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जनस्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते. महापालिकेने मूर्ती स्वीकार केंद्रे देखिल उभारण्यात आली होती.
ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरु झाल्यावर वरुण राजा आशीर्वाद देण्यासाठी आला होता. भर पावसात भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते. ठाण्यात सर्वच भागात भक्तिमय वातावरण पाहण्यास मिळाले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600