जिल्हा
वाढदिवसाचा थीम केक बेतला चिमुकल्याच्या जीवावर
वाढदिवसाचा थीम केक बेतला चिमुकल्याच्या जीवावर
फोटो: ठाणे वैभव
धातूच्या तारा गिळल्या, रुग्णालयात उपचारानंतर धोका टळला
ठाणे : केकवरील चॉकलेट बॉलिंग पिनमध्ये लपवलेल्या दोन धातूच्या सुया (तारा) तीन वर्षांच्या बालकाने नकळत गिळल्याचे समोर आले. या प्रकारामुळे शेलार कुटुंबाला तब्बल 48 तास प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागला.
1 जून रोजी रेयांशचा तिसरा वाढदिवस असल्याने त्याची पार्टी 31 मे रोजी थिम केक कापून साजरी करण्यात आली. पार्टी झाल्यावर केकवरील सजावटीच्या चॉकलेट बॉल्समध्ये धातूच्या तारा असल्याचे मोठ्या मुलांच्या लक्षात आले. यानंतर रेयांशने त्या गिळल्या असाव्यात या भीतीने कुटुंबीयांनी त्याला ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, एक्स-रे तपासणीत त्याच्या लहान आतड्यात दोन सुया अडकलेल्या दिसून आल्या. डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया टाळून निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिला. सुदैवाने, 48 तासांनंतर त्या तारा नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडल्या आणि रेयांशची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लहान मुलांसाठी बनवलेल्या केकमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता आधारासाठी धातूच्या तारा वापरण्यात आल्याने बेकरीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, रेयांशच्या आईने पालकांना मुलांसाठी केक खरेदी करताना त्यातील सजावट आणि अंतर्गत साहित्य पूर्णपणे सुरक्षित आणि खाण्यायोग्य असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे. तर केक बनविणाऱ्यांवर गुन्हा दाखल न करता त्यांना समज दिली आहे. असेही त्यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करण्याचा सल्ला दिला, कारण सुया आधीच आतड्यांपर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्या नैसर्गिकरित्या बाहेर पडण्याची वाट पाहण्याचा सल्ला दिला. रेयांशची आईने सांगितले की रेयांश आता सुरक्षित आहे. "48 तासांनंतर दोन्ही तारा नैसर्गिकरित्या बाहेर पडल्या," ती म्हणाली. "पण ते 48 तास माझ्या आयुष्यातील सर्वात भयावह तास होते."
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600