जिल्हा
मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका 2025-26 सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता प्राप्त झाली असून आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपाच्या 78 जागा निर्विवाद निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
काँग्रेसने 13 जागी विजय प्राप्त केला असून शिवसेनेला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. प्रभाग क्र. 14 मध्ये पूर्वीच्या भाजपचे परंतु यावेळी अपक्ष निवडणूक लढवणारे अनिल भोसले हे एकमेव अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिकेच्या सर्व ९५ जागांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागलेल्या मीरा-भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकडे सुरुवातीला शिवसेना (शिंदे गट) व भाजपा यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. मात्र भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सर्वाधिक जागांची मागणी केली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वबळावर निवडणुक लढवून महापालिकेवर भगवा फडकवण्याची घोषणा केली. 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानामध्ये सुमारे 49.51 टक्के मतदान झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी मतदान मोजणीला प्रारंभ होताच भाजपाचे उमेदवार विजयी होत असल्याचे दिसून येत होते. संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपचे 78 उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून घोषित करण्यात आले. काँग्रेसचे 13 उमेदवार व शिवसेना शिंदे गट तीन उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. प्रभाग क्रमांक 14 मधून पूर्वीच्या भाजपचेच नगरसेवक राहिलेल्या व यावेळेस उमेदवारी नाकारलेल्या अनिल भोसले यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली या निवडणुकीत एकमेव पक्ष उमेदवार म्हणून अनिल भोसले यांना विजय घोषित करण्यात आले आहे. ठाकरे गट, मनसे आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांना खाते उघडता आले नाही.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600