महाराष्ट्र
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश
१४ बालकांची विक्री, दिव्यातील डाॅक्टरसह सात जण गजाआड
मुंबई : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये एका डाॅक्टरचा देखील समावेश आहे. फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या टोळीने आत्तापर्यंत 14 बालकांची विक्री केल्याचं तपासात उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या महिला दलालासह एकूण सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तीन जणांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना पवार, शितल वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय खंदारे यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींनी या गँगच्या माध्यमातून विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत, तर तीन मुली आहेत. कमीत कमी पाच दिवस ते जास्तीत जास्त नऊ महिने असं विक्री केलेल्या बाळांचे वय आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार एका बीएचएमएस डॉक्टरला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फर्टिलिटी फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतील सात लोकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याचं समोर आलं असून दोन बाळांची सुखरुप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. अटकेतील आरोपी मुंबईमधील काही हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. बालक विक्री प्रकरणात काही हॉस्पिटलही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये डॉ. संजय खंदारेचा दिव्यामध्ये दवाखाना आहे. मुळचा नांदेडचा रहिवासी असणारा हा डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आलं आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. म्हणाले की, कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे हे पालक गेले असावेत. तिथं त्यांचा संपर्क झाला असावा असा आमचा संशय आहे. विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करुन रत्नागिरीमध्ये देण्यात आलं होतं. तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती आणि त्यानुसार या बाळांची विक्री केली जात होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करुन या बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता, असेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600