जिल्हा
फक्त ३०० रुपयांत होणार बीएसयुपीची घरे मालकीची!
फक्त ३०० रुपयांत होणार बीएसयुपीची घरे मालकीची!
फोटो: ठाणे वैभव
ठाण्यातील सहा हजारहून अधिक गरीब सदनिकाधारक खुश
ठाणे: ठाणे महापालिकेने बीएसयुपी प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतींमधील गरीब सदनिकाधारकांना अवघ्या तीनशे रुपयांत घराची नोंदणी होऊन मालकी हक्काचे घर मिळणार असल्याने गरिब नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे महापालिकेने जेएनएनयुआरएम आणि बीएसयुपी प्रकल्पांतर्गत शहरी गरिबांना केंद्र सरकारने घरकुल योजना राबवली होती. या योजनेंतर्गत ठाणे महापालिकेने एमएमआरडीए, तुळशीधाम, कोपरी सिद्धार्थ नगर, खारटन रोड, चेंदणी कोळीवाडा, कळवा महात्मा फुले नगर, कासारवडवली, कोलशेत, पडले गाव, भंडार्ली, कौसा, टेकडी बंगला या दहा ठिकाणी ६,३४३ सदनिका बांधल्या आहेत. त्यापैकी ६,२८० सदनिका तयार झाल्या असून ६,२१७ सदनिकांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी २५० जणांनी घराची नोंदणी केली आहे. या इमारतीमध्ये राहणारे नागरिक हे दारिद्रय रेषेखालील असून मोलमजुरी धुणीभांडी करून ते त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत. या सदनिकांच्या नोंदणीसाठी किमान ७८ हजार इतका खर्च असून तो या गरिबांना परवडणारा नसल्याचे समाजसेवक चंद्रहास तावडे यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेऊन या गरिबांच्या नोंदणी फी, मेट्रो सेस आणि एलबीटीचा कर केवळ प्रत्येकी शंभर रुपये इतका आकारण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे गरिबांना केवळ तीनशे रुपये भरून नोंदणी करतात येणार आहे. 12 डिसेंबर 2024 रोजी राज्यपाल यांनी त्यांचा अध्यादेश काढला असल्याने शहरी गरिबांना केवळ तीनशे रुपयांत त्यांच्या घराची नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सुमारे सहा हजार गरीब सदनिकाधारक त्यांची घरे पुढील काळात अवघ्या तीनशे रुपयांत नोंदणी करून मालक बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600