जिल्हा

कळव्यातील ४० अधिकृत इमारतींवर फिरणार बुलडोजर?

नवीन विकास आराखडा रद्द करा - आ. जितेंद्र आव्हाड ठाणे : घरे विकत घेणे परवडत नाही, त्यामुळे एकीकडे ठाणे, मुंबईमधील मराठी माणूस बाहेर जात आहे. याच मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा ठाणे महापालिकेने तयार केला असून डीपी मधील नियोजित रस्त्यामुळे कळव्यातील ४० अधिकृत इमारतींवर बुलडोजर फिरण्याची शक्यता असल्याची भीती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे शहराचा नवीन विकास आराखडा ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केला. हा विकास आराखडा शहरातील अनेक प्रभागांना उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप झाल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कळव्यातील सुदामा, त्रिमूर्ती, एनएम सोसायटी आणि सह्याद्री अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे या विकास आराखड्याला पुन्हा नागरिकांनी विरोध केला. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांची भेट घेतली. महापालिकेचा नवीन विकास आराखडा कळवा खारीगावला उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आ. आव्हाड यांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध केला. ठाण्यात एकही क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही. क्लस्टरच्या नावाने ठाण्यात दादागिरी सुरू झाली असून काही लोकप्रतिनिधी क्लस्टरच्या योजनेचे आम्हीच तारणहार आहोत असे दाखवून नागरिकांना फसवत आहेत. आमच्या नातवाच्या नातवाला घर मिळणार असेल तर त्या योजनेचा फायदा काय असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत विश्वासात घेऊन सांगत नाहीत तोपर्यंत आमचा विरोध आहे. त्यामुळे ठाणेकरांना गृहीत धरू नका, असा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला. कळव्यातील जय त्रिमूर्ती सोसायटीची जागा कब्जा करण्यात आली असून त्या ठिकाणी बेकायदा व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. ही व्यायामशाळा तोडण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. या भागातील स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करून बेकायदा व्यायामशाळा तोडण्यात येत नाही. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून काम करावे. एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करू नये असा सल्ला आव्हाड यांनी दिला. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात मराठी माणूस अस्तित्व टिकवून आहे. या सर्व सोसायट्या अधिकृत असून मूठभर बिल्डारांसाठी कळवा उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला. तसेच नवीन विकास आराखडा बनवताना कोणत्याही प्रकारे अभ्यास करण्यात आलेला नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्काळजीपणाने हा विकास आराखडा बनवला असल्याचा आरोप आव्हाड यांनी आज केला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600