महाराष्ट्र
कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
फोटो: ठाणे वैभव
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान, पुढील दोन-तीन दिवस कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर पुढील तीन-चार दिवसांत मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतील, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला असला तरी अनेक भागात हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्या तुलनेत कोकणात पावसाचा सर्वाधिक जोर होता. मुंबईतही काही दिवस वगळता फारसा पाऊस पडलेला नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईत अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, पुढील तीन-चार दिवस कोकणातील सर्व भागात, तसेच मध्य महाराष्ट्र घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्र वगळता शनिवारपासून इतर भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. मात्र जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी हरियाणा, पंजाब, आणि राजस्थानमधील आणखी काही भागात प्रगती केली आहे.
मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारी बिकानेर, जैसलमेर, झूनझूनू , भारतपूर, रामपूर या भागात होती. पुढील तीन-चार दिवसांत मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
डहाणू येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
डहाणूमध्ये गुरुवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सध्या विदर्भ, मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे तेथील तापमान सध्या २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जात आहे. मुंबईतही गुरुवारी सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २९.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३०.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600