जिल्हा
स्मार्ट मीटर विरोधात महावितरण कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा
स्मार्ट मीटर विरोधात महावितरण कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ : अंबरनाथमध्येही महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात नागरीकांनी अंबरनाथच्या महावितरण कार्यालयाला धडक दिली. स्मार्ट मीटर बाबतची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, तसे केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यानिमित्ताने देण्यात आला.
स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिल जास्त येत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरविरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आणि विविध गैरसमज तयार झाले आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अंबरनाथ येथील शिवसेनेचे नगरसेवक विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वात मी अंबरनाथकर नावाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिमेकडील फातिमा शाळा परिसरातून निघालेल्या मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग होता.
आंदोलकांनी उद्योगपती अदानींची प्रतीकात्मक तिरडी आंदोलनात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अखेर प्रतीकात्मक पुतळा घेऊन हे आंदोलन महावितरण कार्यालयावर धडकले.
नगरसेवक पवन वाळेकर, लेनिन मूककु यांच्यासह राहुल सोमेश्वर तसेच शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
ग्राहकांना विश्वासात घेऊनच यापुढे स्मार्ट मीटर बसवणार आहोत, ग्राहकांच्या वीज बिलासंदर्भात असलेल्या तक्रारीचे निरसन करण्याचा प्रयत्न करू, जुने मीटर आणि स्मार्ट मीटर सिरीजप्रमाणे लावून दोन्ही मीटरबाबत असलेले संभ्रम दूर करू, असे कार्यकारी अभियंता राजेंद्र भांबर यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600