जिल्हा
उमनपात लेटलतिफांना आयुक्तांचा दणका
कार्यालयात प्रवेश नाकारला
उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेत लोकनियुक्त सरकार स्थापन होताच प्रशासनही सतर्क झाले आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पालिका मुख्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. उशिराने आलेल्या प्रवाशांना थेट पालिका मुख्यालयातच प्रवेश नाकारण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पहिल्याच दिवशी तारांबळ उडाली. अखेर या कर्मचाऱ्यांची नोंद करत त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
उल्हासनगर महापालिकेतील प्रशासकीय राजवट गेल्या आठवड्यात संपुष्टात आली. २०२२ पासून उल्हासनगरात प्रशासकीय राजवट होती. या काळात प्रशासकीय प्रमुख बदलले. लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याची जबाबदारीही प्रशासन प्रमुखांवरच होती. या काळात अनेकदा अधिकारी, कर्मचारी वेळेत भेटत नसल्याची तक्रारही अनेकदा झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भेटण्याच्या वेळा ठरवण्याची वेळ आली.
त्यानंतरही महापालिका कार्यालयातील शिस्त ढासळत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. कर्मचारी पालिका मुख्यालयात निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने येत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात कामकाजाचा आढावा घेणे, भेटी देणे अशी कामे रखडत होती. याबाबत महापौर अश्विनी निकम यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अखेर याची गंभीर दखल घेत उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सोमवारी सकाळी अचानक कडक कारवाई केली. सकाळी उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांना पालिका मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.
थेट आय़ुक्तांनीच प्रवेश नाकारा असे आदेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पालिका मुख्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी उभे राहणे पसंत केले. काही कर्मचारी आपल्या वरिष्ठांना मोबाईलवरून संपर्क करून प्रवेश द्या, अशी विनवणी करताना दिसते. याच काळात आयुक्त स्वतः सकाळी वेळेत कार्यालयात उपस्थित राहून प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासत होते. नियोजित वेळ ओलांडून आलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती. काय उत्तर द्यावे याबाबत कर्मचारीही संभ्रमात होते.
महापालिकेचे कामकाज अधिक शिस्तबद्ध करणे, नागरिकांना वेळेत सेवा मिळणे आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिका ही नागरिकांसाठी सेवा देणारी यंत्रणा असून कर्मचारी वेळेवर उपस्थित राहिल्यासच कामे सुरळीत होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर आता कर्मचारी कामाच्या वेळेचे पालन करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यापूर्वीही अशाप्रकारे अनेकदा कारवाई झाली आहे. मात्र त्यानतंरही कर्मचाऱ्यांची लेटलतिफी सुरूच आहे. काही दिवसांसाठी कर्मचारी वेळेवर येतात मात्र त्यानंतर पुन्हा ते उशिराने येऊ लागतात, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात ही कारवाई समज देण्यासाठी करण्यात आली असली, तरी यानंतर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात थेट शिस्तभंगाची प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600