जिल्हा
घोडबंदर येथील रस्त्याची कामे ३० मे पर्यंत पूर्ण करा - आयुक्त
घोडबंदर येथील रस्त्याची कामे ३० मे पर्यंत पूर्ण करा - आयुक्त
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी २४ एप्रिलला करून सर्व कामे २० मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी आयुक्तांनी गुरूवारी (२२ मे) केली. घोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे ३० मे पर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व मेट्रो, एमएमआरडीए आदी प्राधिकरणांना आयुक्त सौरभ राव यांनी निर्देश दिले. तसेच पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणी सूचना फलक लावून वाहतूक सुरळीत सुरू राहील यादृष्टीने नियोजन करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे.
पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट परिसरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची आज आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक विभाग, मेट्रोचे अधिक्षक अभियंता अभिजीत दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रो, विद्युत महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्याची सतत पाहणी करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. संपूर्ण घोडबंदर रस्ता, गायमुखपर्यंत सुरू असलेली कामे पूर्ण होत आली आहेत, शेवटच्या टप्प्यातील कामे ३० मे पर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
ड्रेनेज, कल्व्हर्टच्या साफसफाईचे काम सुरू
पावसाळ्यात घोडबंदर रोडवर पाणी साचणार नाही यासाठी सर्व ड्रेनेज लाईन व कल्व्हर्ट साफसफाई सुरू आहे. तसेच जुन्या ड्रेनेज लाईन या नवीन ड्रेनेज लाईनला जोडण्याचे काम सुरू असून 30 मे पूर्वी सर्व ड्रेनेज लाईन व कल्व्हर्ट साफसफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही दिले असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
कासारवडवली उड्डाणपुलाचे काम 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
कासारवडवली येथील उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या पुलाची पाहणी देखील आयुक्तांनी यावेळी केली. सद्यस्थितीत या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित कामे 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600