देश-विदेश
राज्यात काँग्रेसला मिळणार नवा कॅप्टन
राज्यात काँग्रेसला मिळणार नवा कॅप्टन
फोटो: ठाणे वैभव
अध्यक्षपदासाठी चारजण रेसमध्ये
नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतर नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर काल मंगळवारी त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात कुणाला संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदासाठी राज्यातून चार नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये, एक नाव मराठवाड्यातील असून दुसरे नाव विदर्भातील आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, काँग्रेसचे निष्ठावान आणि आदिवासी नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्ली दौऱ्यानंतर नाना पटोले यांनी पुढील आठवड्यातच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. काँग्रेसला राज्यात आता नवा कॅप्टन मिळणार असून याच आठवड्यात नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले असून प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा याच आठवड्यात सुटेल, असा विश्वास नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. त्यानुसार, आता दिल्लीत महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्यामध्ये, कोल्हापुरातील नेते व माजी मंत्री सतेज पाटील, लातूरमधील नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर, माजी मंत्री व युथ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या आमदार विश्वजीत कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. मात्र, या तीन नावांसह सरप्राईजींग नाव म्हणजे बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची धुरा देऊन आदिवासी समाजाला नेतृत्व देण्याचा प्रयत्नही काँग्रेसच्या विचाराधीन आहे.
नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी कोल्हापुरात पाटील तर लातुरातून देशमुख यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. तसेच, विश्वजीत कदम यांचेही नाव समोर येत आहे. त्यामुळे, मराठवाडा आणि पश्चिम महारष्ट्रातील नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की, विदर्भातील हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसकडून संधी मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600