जिल्हा
ठाण्यात देशातील पहिले दिव्यांग पूरक सिग्नल
ठाण्यात देशातील पहिले दिव्यांग पूरक सिग्नल
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: देशातील पहिला दिव्यांग पूरक सिग्नल ठाण्यात तयार करण्यात आला असून सर्व प्रकारच्या सुविधा असल्याने त्यातून सुगम्य वातावरणाची निर्मिती झाली आहे.
वाहतुक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या वतीने आणि ठाणे शहर वाहतुक शाखा आणि मंगेश देसाई यांच्या सहकार्याने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली आहे.
ठाण्यात नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढत आहे. तीनहात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी-माजिवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात. या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावे लागते. दृष्टीहिनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कधी-कधी अन्य व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. अशावेळी बीपरच्या सहाय्याने त्यांना सिग्नल समजून असे व्यक्ती सहज रस्ता ओलांडू शकतात. अस्थिव्यंग आणि अपंग लोकांकरीता प्रत्येक सिग्नल व रॅम्प तयार करण्यात आले असून त्यावरून व्हिलचेअर जाण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे त्याच्या बाजुला पकडण्याकरीता रेलींग लावले असुन वृद्ध लोकांसह इतर शारिरिक अपंगत्व असणा-या सर्व व्यक्तीकरिता उपयुक्त ठरत आहे. रॅम्पवर टेकटाईल लावण्यात आल्या असून प्रत्येक सिग्नलला अशाप्रकारचे ब्रेलमधील बोर्ड लावले आहेत. रस्त्यावरील थर्मर चित्र हे देखील दृष्टीबाधितांना त्याच्या स्पर्शातून जाणवेल असे करण्यात आले आहे.
दिव्यांगासह इतरही सर्वसामान्य पादचाऱ्यांना या सिग्नलची मदत होत आहे. भारतातील अशी सर्वसमावेशक सर्वात मोठी सिग्नल यंत्रणा ठाण्यातील तीनहात नाका येथे बसवली असून डॉ. सुमित पाटील यांची ही संकल्पना आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600