जिल्हा
भिवंडीतील राड्याप्रकरणी भाजप आमदारपुत्रासह शेकडो जणांविरोधात गुन्हे
५० जणांना अटक
ठाणे : भिवंडी येथील महापालिका निवडणूक निकालानंतर कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी भाजपचे आमदार महेश चौघुले यांचा पुत्र, कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख तथा भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्यासह शेकडो जणांविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी ५० जणांना अटक केली असून आमदारांचा मुलगा मीत चौघुले, माजी महापौर विलास पाटील अद्याप अटकेत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरण तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मीत चौघुले हा कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवारासमोर पराभूत झाला होता. या निकालानंतर कोणार्क विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाजमाध्यमांवर वाद निर्माण होऊ लागला होता. दरम्यान, कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या निवासस्थानावर दगडफेक झाली होती. हा हल्ला महेश चौघुले यांच्या मुलाने केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन सुरु केले होते. या भागात आमदार महेश चौघुले यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये बेदम हाणामारी झाली.
पोलिसांसमोर हा सर्व प्रकार सुरु होता. त्याचे चित्रीकरण देखील समाजमाध्यमावर प्रसारित झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे परस्पर विरोधी चार गुन्हे दाखल झाले होते. तर पोलिसांनी देखील स्वतःहून याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला आहे. यातील एका गुन्ह्यामध्ये मीत चौघुले, विलास पाटील यांचाही सामावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करुन ५० जणांना अटक केली आहे. यातील ३६ जण हे कोणार्क विकास आघाडीचे आहेत. तर उर्वरित १४ जण भाजपचे कार्यकर्ते आहेत. मीत चौघुले आणि विलास पाटील अद्याप अटकेत नसल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600